धुळे ः टुडे १ साठी
---
शिंदखेडा पालिका भूखंडाचा वाद
जिल्हाधिकाऱ्यांकडे सातबारा नोंदीच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. २ ः शिंदखेडा नगरपंचायतीच्या मालकीच्या आदर्श कॉलनी परिसरातील मोकळ्या भूखंडावर (ओपन स्पेस) तहसीलदारांच्या शासकीय निवासासाठी लावण्यात आलेली नोंद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया किंवा नगरपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता ही नोंद कशी करण्यात आली, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिंदखेडा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर आक्षेप नोंदवत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पक्षाचे माजी नगरसेवक अरुण देसले आणि विद्यमान नगरसेविका सुनीता देसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिंदखेड्यातील आदर्श कॉलनी परिसरातील केदारेश्वर मंदिराजवळील प्लॉट नं. ४३९/१ अ, एकूण क्षेत्र ८७०.०५ चौमीपैकी ३७२.०० चौमी क्षेत्राबाबत सातबाऱ्यावर ‘मा. तहसीलदार, शिंदखेडा यांचे शासकीय निवासस्थानासाठी राखीव’, अशी नोंद २ सप्टेंबर २०२६ च्या उताऱ्यावरून निदर्शनास आली आहे. नोंद ही शिंदखेडा तहसीलदारांकडील फेरफार नोंद ८ जून व २३ जून २०२२ च्या आधारे दिलेल्या आदेशतून दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर भूखंड हा नगरपंचायत शिंदखेडा यांच्या मालकीचा असताना कोणताही ठराव, संमती, हस्तांतरण आदेश किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नोंद कशी करण्यात आली, याची चौकशी व्हावी. फेरफार नोंद कोणत्या मूळ कागदपत्राच्या, आदेशाच्या किंवा ठरावाच्या आधारे करण्यात आली, याची संपूर्ण तपासणी करण्यात यावी. महसूल अभिलेखाच्या प्रक्रियेनुसार नोंद तपासून नियमबाह्य किंवा अधिकारबाह्य असल्यास ती रद्द करून नगरपंचायतीच्या मालकीची अभिलेखीय स्थिती पूर्ववत करावी. विहित प्रक्रियेचे उल्लंघन किंवा अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. भूखंडावर नागरी आरोग्य व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ‘ओपन जिम’ उभारण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या सभेत ठेवून ठराव करावा, अशी मागणी श्री. देसले, नगरसेविका देसले यांनी केली आहे.