फुटलेल्या पेपरची दोन कोटींना विक्री

फुटलेल्या पेपरची दोन कोटींना विक्री
Published on
फुटलेल्या पेपरची दोन कोटींना विक्री --- पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : राज्यात प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटत असून, या गैरप्रकारात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते थेट जबाबदार आहेत. फुटलेला पेपर दोन कोटींना विकला जातो. एवढा मोठा घोटाळा होऊनही एकाही आरोपीला कडक शिक्षा होत नाही. सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मंगळवारी (ता. २) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कुठल्या मूर्खाने सांगितले? असा प्रश्‍न उपस्थित करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. २०२३ मध्ये घटनादुरुस्ती विधेयकावेळी आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. वास्तविक, महिला आरक्षणाचे खरे जनक काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आरक्षणाच्या गप्पा मारतो; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी महिला सरसंघचालक करणार का? असा प्रश्‍नही चव्हाण यांनी केला. राहुल गांधींच्या प्रवासादरम्यान रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत चव्हाण यांनी मिंधे-भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. आज राज्यातील सर्व रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. आगामी कुंभमेळ्याचा कोणताच ठोस प्रकल्प अहवाल तयार नाही. प्रत्येक कामात ४०-४० टक्के ‘कमिशन’ उकळले जात आहे. अगदी शक्तिपीठ महामार्गातही मोठ्या प्रमाणात दलाली आणि ‘कमिशन’खोरी सुरू आहे, असा थेट आरोप त्यांनी या वेळी केला. कुठलाही गुप्त अजेंडा नाही : ठाकरे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यामागे कोणताही राजकीय गुप्त अजेंडा नाही. ‘संघटन सृजन अभियाना’च्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करणे आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर नेते व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याची माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. नूतन जिल्हाध्यक्षांच्या होत असलेल्या प्रशिक्षण शिबिरातून संघटनात्मक कामाची दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com