‘ते’ ड्रग्ज जाणार होते मुंबईच्या दिशेने?
---
संशयिताची कबुली; प्रत्येक खेपेमागे ८० हजारांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : औद्योगिक वसाहतीतून जप्त केलेल्या ‘एफेड्रीन’चा जप्त साठा मुंबईला पाठविण्याची तयारी होती, अशी माहिती अटकेतील संशयिताने पोलिसांना दिली. संशयित नूर मोहंमद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण) याने गांजा आंध्रप्रदेशातील चित्तापल्ली येथून आणल्याचीही कबुली दिली. पटेलविरुद्ध यापूर्वी हैदराबाद येथे गुन्हा दाखल असून, त्याने सहा महिने कारागृहात शिक्षा भोगली आहे.
आरोग्यासाठी घातक ‘एफेड्रीन’चा १ किलो ९६३ ग्रॅम व गांजाचा २ किलो ११४ ग्रॅमचा साठा सोमवारी (ता. ३१) रात्री स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी जप्त करून नूर मोहंमद अब्दुल सलाम पटेल याला अटक केली. त्याने तपासात एफेड्रीन साठा मुंबईसाठी पाठविला जाणार होता, अशी माहिती दिली. मात्र, या माहितीवर पोलिसांना विश्वास नसून जर मुंबईसाठी माल पाठवला जाणार होता तर तो जळगावला येईल कसा, हा सर्व माल जळगावसह इतरत्र वाटप होणार होता. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
एका खेपचे ऐंशी हजार
नूर पटेलला पार्सलमध्ये नेमके काय आहे, याची जाणीव होती. एफेड्रीनचा साठा पुरविण्यासाठी नूर पटेलला एका खेपसाठी ८० हजार रुपये मिळणार होते. त्यापूर्वीच लाखो रुपयांचा साठा पोलिसांच्या हाती लागला. कपड्यांचा व्यवसाय करण्याच्या आडून तो पुन्हा अंमली पदार्थांची ने-आण करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
चौकट
राज्यात दहापेक्षा जास्त कारवाई
एफेड्रीन तस्करीबाबत आतापर्यंत ठाणे, पालघर, सोलापूर व इतर ठिकाणी कारवाई झाली. सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठा साठा जप्त केला होता. पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत जळगावात सर्वाधिक १ किलो ९६३ ग्रॅम साठा जप्त केला आहे.