ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविणारे : जिजामाता गर्ल्स हायस्कूल
मविप्र समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतदादा मोरे, कै. डी. आर. भोसले, कै. विठ्ठलराव हांडे, ॲड. बाबूराव ठाकरे, कै. वसंतराव पवार व देणगीदारांच्या योगदानातून उभी राहिलेली ही संस्था बहुजन समाजासाठी ज्ञानाची दालने खुली करणारी ठरली. त्यातील एक महत्त्वाचे दालन म्हणजे सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज.
- साधना माळेकर, सटाणा
देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सटाण्यात २ जून १९६१ रोजी या विद्यालयाची स्थापना झाली. बागलाणमध्ये उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आद्य संस्थापकांसह कै. अभिमन नानाजी पाटील, कै. अजबादादा पाटील, कै. कर्मवीर आबासाहेब सोनवणे, कै. लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील, कै. पुंडू भिवसन सोनवणे आदी समाजधुरिणांनी भक्कम साथ दिली. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. पहिली विद्यार्थिनी श्रीमती प्रेमलता विश्वनाथ चंद्रात्रे यांचा प्रवेश १२ जून १९६१ रोजी झाला. विद्यार्थिनींची वाढती संख्या लक्षात घेऊन १९७५ मध्ये कला शाखेचे ज्युनिअर कॉलेज सुरू झाले. आज विद्यालयात १६५० जिजाऊ शिक्षण घेत आहेत. विद्यालयाच्या इमारतीसाठी कै. बाबूराव व कै. आबासाहेब सोनवणे यांनी प्रत्येकी १० हजार रुपये, कै.बाबुशेठ अग्रवाल यांनी १० हजार रुपये मदत केली. शिक्षकांनी चार बेसिक पे, तर विद्यार्थिनींनी श्रम व आर्थिक मदत केली. शेतकरी सहकारी संघातून भिला पाटील यांनी २० हजार रुपयांचे लोखंड उसनवार दिले. कवी सुधीर फडके यांचे गीतरामायण, सुलोचना चव्हाण यांचा नृत्याविष्कार, दामोदर मालवणकर व विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून निधी उभारून दिमाखदार इमारत साकारली.
कै. आर.टी. सोनवणे मुख्याध्यापक असताना झालेल्या वार्षिक तपासणीत औरंगाबाद विभागाच्या महिला शिक्षणप्रमुखांनी मुलींच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी महिला मुख्याध्यापिका असावी, अशी सूचना केली. एम. ए., बी.एड. महिला शिक्षक उपलब्ध असताना हा प्रस्ताव मांडण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक कै. डी. एम. देवरे यांनी मान्यता देत महिला मुख्याध्यापिकेचा नियम संस्थेकडे पाठविला. तेव्हापासून ही परंपरा कायम आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. स्पर्धा परीक्षांचे आयोजन आणि समाजभूषण पुरस्कार ही विद्यालयाच्या गुणवत्तेची साक्ष आहे. २५ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा चिटणीस दिलीप भावसा दळवी, संचालक डॉ. प्रसाददादा सोनवणे व महिला संचालिका शालनताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस. बी. मराठे, श्रीमती बी. बी. सावकार, श्रीमती जे. बी. देवरे तसेच माजी विद्यार्थिनी सुनीता पगार, ज्योती रौंदळ, भारती मोरे, मनिषा सोनवणे, अर्चना पाटील यांनी मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करून विद्यालयासाठी निधी मिळवून दिला.
सांस्कृतिक, विज्ञान, भूगोल, क्रीडा, चित्रकला विभागांत विद्यालयाची भरीव कामगिरी आहे. समाजदिन वक्तृत्व व विज्ञान मेळाव्यात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक, क्रीडा स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड, शासकीय एलिमेंटरी-इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकाल तसेच नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील विशेष नैपुण्य उल्लेखनीय आहे. लखनौ येथील १९व्या आंतरराष्ट्रीय सिल्वर ज्युबली स्काउट-गाईड जांबोरीत मनिषा सोनवणे व अरुणा खरे यांच्या नेतृत्वाखाली १७ विद्यार्थिनी सहभागी झाल्या; आठ विद्यार्थिनींनी राज्य पुरस्कार मिळवले. ‘मेरी मिट्टी मेरा देश’, ‘हर घर तिरंगा’, ‘एक पेड माँ के नाम’, ‘कमवा व शिका’अंतर्गत आनंद मेळावे व जिल्हा मेळावे घेत जनजागृती केली जाते. मागील वर्षी दहावीचा निकाल ९७.४२, तर बारावीचा ८४.२१ टक्के लागला. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवत, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधत नवीन सुशिक्षित, जबाबदार व सर्वगुणसंपन्न नागरिक घडविणारे हे जिल्ह्यातील नामवंत, अग्रणी विद्यालय आहे. शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची ही उज्ज्वल वाटचाल आजही अविरत सुरू आहे.
(लेखिका जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका आहेत.)