NSK26H28608
जळगाव : ड्रग्जचा साठा जप्त करताना मुंबई व जळगावचे पथक.
---
NSK26H28607
प्रयागराज येथून जप्त केलेला मुद्देमाल.
--------
प्रयागराजमध्ये ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त
१३१ कोटींचा मेफेड्रीन जप्त; जळगावच्या दोघांसह २१ अटकेत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अमली पदार्थांचे जाळे पसरविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील शेतात सुरू असलेला एमडी ड्रग्जचा बेकायदा कारखाना उद्ध्वस्त केला व २१ संशयितांना अटक करून १३१ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले.
नालासोपारा येथे २४ जूनला पोलिसांनी ११२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह अविनाश उर्फ सोनू अय्यर (वय २२) आणि रविकांत राम (वय २३) यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेला (युनिट ४) सोपविण्यात आला.
गुजरात ते जळगाव नेटवर्क
पोलिसांना ड्रग्ज रॅकेटचे आंतरराज्यीय धागेदोरे सापडले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अब्दासा येथे शेतात एमडी तयार करणारी अवैध फॅक्टरी निष्पन्न करून संशयित जुम्मा ठाकरा याला अटक केली. नंतर कल्याण आणि नेरळ (रायगड) येथे लॅब साहित्य व केमिकल्स साठवून ठेवल्याचे उघड झाले.
पथक जळगावात
मुंबईच्या कुर्ल्यातून हसीब सिद्दीकी ऊर्फ इजाज मर्चंटकडून ११ किलो ४०४ ग्रॅम एमडी आणि १८.७० लाखांची रोकड जप्त केली. त्याच्याकडून जळगावमधील रफिक पिंजारी आणि सय्यद मुशाहिद अली यांना विक्री केलेले ४ किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जळगावातून जप्त करण्यात आले.
शेतात कारखाना
पोलिसांना प्रयागराजमधील मेजा तहसील, कोसाडा काला येथे शेत भाड्याने घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये एमडी निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली. छाप्यात ५२.९३२ किलो एमडी, २५० लिटर रसायने व प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन
पोलिसांनी आतापर्यंत ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोकड आणि केमिकल, असा एकूण १३१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून एकूण २१ संशयितांना अटक केली आहे. या टोळीचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यता आहे.