आठ शेतांमधील पपई, कपाशीची झाडे कापून फेकली
---
शेतकऱ्यांचे पावणेतीन लाखांचे नुकसान, चार जणांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २ : विविध आठ शेतकऱ्यांच्या शेतांमधील पपई, कपाशी, मिरची पिकाची झाडे कापून फेकल्याने शेतकऱ्यांचे सुमारे पावणेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील नळवे गावाच्या शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांवर नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी वासुदेव हरी चौधरी (रा. नळवे खुर्द, ता. नंदुरबार) यांच्या शेतातील पपईची १०० झाडे कापून फेकली. यामुळे चौधरी यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिलीप संगा पवार यांच्या शेतातील पपईची झाडे कापून फेकली. पवार यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुभाष टिला पाटील यांच्या शेतातील पपईची १०० झाडे कापून फेकली. त्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले, तसेच मिरची पीक उखडून फेकले. त्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रदीप शांतीलाल पाटील यांच्या शेतातील कपाशीची ५० झाडे कापून फेकली. त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. श्रीपद नथ्थू पटेल यांची पपईची १५० झाडे कापून फेकली. त्यांचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रामकृष्ण हरी चौधरी यांच्या शेतातील पपईची १२० झाडे कापून फेकली. त्यांचे ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले. मुकेश जयंतीलाल चौधरी यांच्या शेतातील पपईची ९० झाडे कापून फेकली. त्यांचे २७ हजारांचे नुकसान झाले. असे एकूण दोन लाख ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हवालदार सुपडू राठोड तपास करीत आहेत.