जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘देहविक्री’
नेपाळी, बंगालीसह ६ महिलांची सुटका; घरमालकासह दोघांवर गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : शहरातील रिंगरोडवरील चौकात लेडीज स्पाच्या आडून सुरू असलेल्या कथित देहविक्रय व्यवसायाचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला. छाप्यात सहा महिलांची सुटका केली. या प्रकरणी स्पाचालकासह जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, नेपाळ, पश्चिम बंगाल व सिक्कीममधून महिलांना आणल्याचे तपासात समोर आले आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडवरील ख्वॉजामिया चौकात अत्याधुनिक मसाज सेवांच्या नावाखाली कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सुचनेनुसार परिविक्षाधीन उपअधीक्षकांसह जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
अचानक छापा
पोलिसांनी घटनास्थळावरून मसाज थेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्या ६ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली. यात दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथील २६ वर्षीय महिला, मणिपूर येथील ३१ व ३७ वर्षीय महिला, पूर्व सिक्कीम येथील ३० व ३१ वर्षीय महिला, आणि नेपाळच्या बांके येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नेपाळ येथील महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा स्थिती आणि सीमापार प्रवासाच्या पार्श्वभूमीची पोलिस सध्या सविस्तर पडताळणी करण्यात येत आहे. ९९ स्पाचा चालक संशयित निरजसिंग पांड्या (रा. मुखर्जीनगर, रतलाम, मध्य प्रदेश), जागामालक संशयित राजेंद्र पुंडलीक चव्हाण (रा. यशवंतनगर, रिंगरोड, जळगाव) या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.