टुडे १, मेन
---
NSK26H28625
जळगाव : शहरातून जाणारा महामार्ग. (संग्रहित छायाचित्र)
------
कंत्राटदारांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘मेहेरबान’
उपशीर्षक
शहरातील महामार्गाचे नूतनीकरण; देखभाल- दुरुस्ती काळ संपण्याआधी कामाचा घाट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : कामाचा निकृष्ट दर्जा, त्यामुळे होणारी महामार्गाची दुरुवस्था, त्यातून वाढलेले अपघात आणि अपघातांमध्ये जाणारे बळी या स्थितीशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (न्हाई) कुठलेही सोयरे-सुतक राहिलेले नाही असे चित्र आहे. उलटपक्षी ‘न्हाई’ कंत्राटदारांवर ‘मेहेरबान’ असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गाचा देखभाल- दुरुस्ती जबाबदारी कालावधी संपण्याआधीच त्याच्या नूतनीकरणाचे काम मंजूर करुन ते सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाढती लोकसंख्या, महामार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या नागरी वस्त्या आणि त्यामुळे महामार्गावरही वाढलेला वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०२० मध्ये हाती घेण्यात आले. ७३ कोटींच्या निधीतून खोटेनगर ते कालिंकामात मंदिरापर्यंतच्या ७ किलोमीटर टप्प्यात दादावाडी, अग्रवाल हॉस्पिटल चौक, प्रभात चौक अशा तीन ठिकाणी भुयारी मार्गासह उड्डाण पूल तर आकावाणी, इच्छादेवी व अजिंठा चौकातील सर्कलसह हे काम २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले. जांडू कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीने हे काम केले.
कामाच्या दर्जाबाबत तक्रारी
हे काम सुरू करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत कामाचा दर्जा, स्वरुप आणि एकूणच रचनेबद्दल तज्ज्ञांनी, जळगावकर नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. लोकप्रतिनिधींनीही नियोजन समिती, रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकांमधून तक्रारी केल्या. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि हे काम तसेच रेटून पूर्ण करण्यात आले.
१४-२
दुरुस्ती जबाबदारी काळ
संपण्याआधीच नूतनीकरण
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार जांडू कन्स्ट्रक्शनमध्ये या कामाबाबत झालेल्या करारानुसार या सात किलोमीटर टप्प्यातील कामाचा देखभाल- दुरुस्ती जबाबदारी कालावधी (defect liability period) ५ वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. २०२२ मध्ये काम पूर्ण झाले असल्याने हा कालावधी मार्च २०२७ पर्यंत आहे. असे असताना याच महामार्गावर याच टप्प्यात नव्याने ‘व्हाइट टॉपिंग’चे (कॉंक्रिटीकरण) काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे नूतनीकरण व सोबत बांभोरीजवळील गिरणा नदीवरील पुलास समांतर पूल अशा स्वरुपाचे काम ड्रीम कन्स्ट्रक्शन (नंदुरबार) या कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे.
१४-१
कंत्राटदारावर मेहेरबानी
आधीच्या कामाचा देखभाल- दुरुस्ती जबाबदारीचा कालावधी संपण्याआधीच रस्त्याच्या नूतनीकरणाचा घाट घालण्याचा प्रकार म्हणजे, आधीच्या कंत्राटदारावर ‘मेहेरबानी’ करण्यासारखे आहे. कारण, मार्च २०२७ पर्यंत या रस्त्याच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी जांडू कन्स्ट्रक्शनवर आहे. गेल्या चार- पाच वर्षांत शहरातून गेलेल्या या महामार्गाची दशा काय झाली, हे जळगावकर अनुभवत आहेत. असे असूनही या वर्षांमध्ये कंत्राटदाराने महामार्गाची दुरुस्ती चांगल्या पद्धतीने केलेली नाही. आणि आता तर या कामाचे अपग्रेडेशन करण्याच्या नावाखाली नवीन काम मंजूर झाल्याने आधीच्या कामाविषयी भाष्य करण्याची सोयच राहिलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रणा जळगाव विभागात तरी केवळ नावालाच आहे, अशी स्थिती निर्माण झालीय.
-------
पाच वर्षांतच नूतनीकरण
मुळात, ७३ कोटींचा खर्च करून जळगाव शहरातील या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. २०२० ला काम सुरू होऊन तीन वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये ते पूर्ण झाले. तेव्हापासून मार्च २०२७ पर्यंत या चौपदरीकरणाच्या कामाचा देखभाल- दुरुस्ती जबाबदारी कालावधी होता. हा कालावधी संपण्याआधी, म्हणजेच पाच वर्षांतच या कामाचे नूतीनकरण करावे लागणे हे महामार्ग प्राधिकरण यंत्रणेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
-----
(सूचना : खालील दोन चौकटी समोरासमोर घेणे)
असे झाले या महामार्गाचे काम
टप्पा : खोटेनगर ते कालिंका माता मदिर
अंतर : ७ किलोमीटर
स्वरुप : चौपदरी डांबरीकरण
उड्डाणपूल : तीन ठिकाणी
रोटरी सर्कल : तीन चौकांमध्ये
कामावरील खर्च : ७३ कोटी
देखभाल दुरुस्ती काळ : ५ वर्षे (मार्च २०२७ पर्यंत)
आता नवीन काम
प्रकार : व्हाइट टॉपिंग (कॉंक्रिटीकरण)
स्वरुप : मूळ डांबरी रस्त्याच्या स्क्रॅपिंगसह
टप्पा : खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर
अंतर : ७ किलोमीटर
सेवारस्ते : कॉंक्रिटीकरण
अन्य काम : बांभोरीजवळ समांतर पूल
खर्च अपेक्षित : ७९ कोटी
----------