‘विकसित भारत...’मध्ये
युवकांनी सहभागी व्हावे
नंदुरबार, ता. ३ : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय अंतर्गत ‘माय भारत’तर्फे ‘विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग’ या राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम दिल्ली येथे ९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि देशाच्या भविष्यासाठी युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विकसीत भारत चॅलेंजमध्ये युवकांना विविध टप्प्यांमधून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील युवकांनी युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘माय भारत’च्या नंदुरबार केंद्रातर्फे केले आहे.
विकसित भारताच्या संकल्पनेशी युवकांना जोडणारे आणि राष्ट्रीय स्तरावरील युवा नेतृत्वासाठी मार्ग उपलब्ध करून देणारे हे व्यासपीठ आहे. प्रत्येक राज्यातून निवडक युवक राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणार आहेत. याअंतर्गत आयोजित ‘विकसित भारत क्विझ’ मध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवा मंडळे, युवक- युवती आणि युवा स्वयंसेवकांनी या उपक्रमाची माहिती युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.