फोटो : NSK26H28632
नंदुरबार : प्रशिक्षणाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांसमवेत आत्माचे दीपक पटेल, डॉ. राजेंद्र दहातोंडे, विघ्नराज बेहरा, किरण अहिरे आदी.
-----------------------
पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करावा
दीपक पटेल : हवामान बदलासंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये आवश्यक बदल करणे काळाची गरज आहे. बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी केले.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि मैत्रीत्व चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘हवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर शेतकऱ्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात वाघाळे येथील १५ महिला शेतकरी तसेच अजेपूर येथील १५ पुरुष अल्पभूधारक शेतकरी सहभागी झाले. हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारे परिणाम, आवश्यक उपाययोजना, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जैविक शेतीचे महत्त्व, सेंद्रिय खतांचा वापर, गांडूळखत निर्मिती व वापर, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व, शेताच्या बांधावर व उपलब्ध जागेत विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक विघ्नराज बेहरा, मैत्रीत्व चॅरिटेबल फाउंडेशनचे संचालक किरण अहिरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उमेश पाटील, जयंत उत्तरवार आणि पद्माकर कुंदे, आरती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. राजेश भावसार, प्रवीण चव्हाण आणि संदीप कुवर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.