टुडे पान २ ढर: मेन फिचर
(एआय चित्र वापरावे)
----
दोषदायित्वातील रस्त्यांकडे आता मनपाचे लक्ष
पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीचे निर्देश; बांधकाम विभागाकडून मागविला अहवाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरून महापालिकेने आता लक्ष केंद्रित केले आहे. काम पूर्ण होऊन अल्पावधीतच काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेण्याची भूमिका घेतली आहे. शहर अभियंता योगेश बोरोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून पाच प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील विविध रस्त्यांची कामे ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव’ या मक्तेदारामार्फत करण्यात आली आहेत. यापैकी काही रस्त्यांवर काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच खड्डे पडणे, पृष्ठभाग उखडणे आदी प्रकार निदर्शनास आले आहेत. संबंधित कामे अद्याप दोषदायित्व कालावधीत असल्याने दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे मनपाने निदर्शनास आणून दिले आहे.
पाच रस्त्यांकडे तातडीने लक्ष
मनपाने पत्राद्वारे काव्यरत्नावली चौक ते राजमाता जिजाऊ चौक, डी-मार्ट ते गिरणा पाण्याची टाकी ते लक्ष्मी संकुल, राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हे नगर १०० फूट रोडपर्यंतचा पॉलिटेक्निक ग्राउंडलगतचा रस्ता, संभाजीनगर स्टॉप ते मोहाडी रोड तसेच मोहाडी रोड ते संत गाडगेबाबा चौक ते पठाण बाबा दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
चौकट
सर्व कामांची माहिती मागविली
दरम्यान, केवळ या पाच रस्त्यांपुरता विषय मर्यादित न ठेवता बांधकाम विभागाने शहरात केलेल्या इतर रस्त्यांच्या कामांचीही माहिती महापालिकेने मागविली आहे. कोणते रस्ते केव्हा पूर्ण झाले, त्यांचा दोषदायित्व कालावधी किती आहे आणि सध्या त्यांची स्थिती काय आहे, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोषदायित्व कालावधीतील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पुढील काळात संबंधित कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे.