टुडे एक मेन फिचर
---
(एआय चित्र वापरावे)
---
उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ‘ड्रग्ज’ जळगावात
दोन दिवसांत सात किलो अमली पदार्थ जप्त; शेकडो तरुणांना नेणार होते नशेच्या आहारी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे खोलवर पसरले असून, जळगावमधून दोन दिवसांत तब्बल सात किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबईच्या मीरा-भाईंदर गुन्हेशाखेने पाच किलो आणि जळगाव पोलिसांनी दोन किलो ड्रग्ज जप्त केल्याची ही कारवाई झाली. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा होत असून, या कारवाईने राज्याची स्थिती ‘उडता पंजाब’सारखी झाल्याचे उघड झाले आहे.
जळगावसारख्या कुटुंबवत्सल शहरातही ड्रग्जचे फॅड वेगाने पसरत असून गल्लीबोळात पेडलर सक्रिय झाले आहेत. ड्रग्जच्या अंमलाखाली अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, महिलेवर चाकूहल्ला अशा घटना ताज्या आहेत. दोन दिवसांत पाच व दोन किलो ड्रग्जच्या दोन खेपा जप्त झाल्या. एका नशेबाजाला सुमारे एक ग्रॅम पुरेसा असल्याने सात किलो ड्रग्ज शेकडो तरुणांना नशेच्या आहारी नेणार होते. ते सर्व जळगाव, धुळे, मालेगाव, बुलढाणा येथील तरुण पिढी असल्याचे तपासात समोर येत आहे.
ड्रग्ज सेवनाची विविध कारणे
सेक्स पॉवर व वेळ वाढविणे, हॅप्पी फिलिंग, शरीरसौष्ठव आणि अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ड्रग्ज उपयुक्त असल्याचा ऑनलाइन व तोंडी प्रचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जळगावात इफेड्रीन व मॅफेड्रीनची मागणी वाढल्याचे जप्त साठ्यांवरून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातही रोवले पाय
पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातमधील ड्रग्ज नेक्ससने महाराष्ट्रातही पाय रोवले आहेत. गुजरात बंदरावर उतरणारे सिंथेटिक ड्रग्ज अवघ्या २४ तासांत दोन-तीन राज्यांत पोहोचवले जातात. पूर्वी मुंबई केंद्रस्थानी असताना आता गुजरातने आघाडी घेतली आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे माफिया काही तासांत पेडलरपर्यंत ऑर्डर पोहोचवतात.
प्रचलित ‘ड्रग्ज’
नैसर्गिक स्वरूपातील : झाड-पाला आणि उत्पादनातून गांजा, अफू, मॉर्फिन.
अर्ध-सिंथेटिक : नैसर्गिक अंमलीपदार्थांवर प्रक्रिया कररून कोकेन, हेरॉईन तयार होते.
सिंथेटिक : हे पूर्णतः अनैसर्गिक उत्पादन असून त्यात मेथअॅम्फेटामिन, एकस्टसी, मेफेड्रोन, केटामाईन, इफेट्रॉन अशा ड्रग्ज प्रकाराचा समावेश होतो.
उत्तेजक : हे ड्रग्स मेंदू व मज्जासंस्थेच्या क्रियाशीलतेत वाढ करतात. (कॅफीन, निकोटीन, अॅम्फेटामिन्स).
दबावक : हे ड्रग्ज मेंदूच्या क्रियाशीलतेत घट करतात, ज्यामुळे शांतता, झोप आणि चिंता कमी होणे यासारखे परिणाम होतात. त्यात मद्य बेंझोडायझेपिन्स, ओपिओइड्स.
अवसादरोधी औषधे : हे ड्रग्ज नैराश्य आणि इतर मनोविकारांवर उपचारासाठी वापरली जातात. मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटरवर परिणाम करून ही औषधे काम करतात.
विद्यार्थ्यांना चटक
जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांपर्यंत या ड्रग्जचे मार्केट व्यापले असून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात या ड्रग्जचे सेवन करू लागले आहेत.
ड्रग्ज निर्मितीचे कारखाने
महाराष्ट्रात ड्रग्ज निर्मितीचे जाळे विस्तारत असून चाकण, मुंबई, ठाणे, नाशिक, कुर्डुवाडी (सोलापूर) व इस्लामपूर (सातारा) येथे मोठे साठे यापूर्वी आढळले आहेत. त्यामुळे गाव-तालुक्यांपर्यंत पुरवठा वाढल्याचे स्पष्ट होते. मिराभाईंदर गुन्हेशाखेने प्रयागराजमधील कारखाना उद्ध्वस्त करून ५० किलो मेफेड्रीन व कच्चे रसायन जप्त केले. प्रकरणात २१ संशयित अटकेत असून मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे.
चौकट
अंडरवर्ल्डचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
ड्रग्ज निर्मिती-वितरणाच्या साखळीत अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांचा सहभाग स्पष्ट होत आहे. कमी श्रमांत मोठा पैसा मिळत असल्याने गुन्हेगारांनी या व्यवसायात प्रवेश केला असून आखाती देशांतून भारतातील कारभार चालवला जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुंड व रेकॉर्डवरील टोळ्यांचे हस्तकही सक्रिय आहेत. मुंबई पोलिसांना प्रॉडक्शन, वितरण व हँडलर यंत्रणा चालविणाऱ्या किंगपिनचा शोध आहे.
हायफाय ड्रग्ज
प्रक्रियाकृत ड्रग्जमध्ये हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग्ज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन व कॅथिनॉनचा समावेश होतो. ‘म्याऊ म्याऊ’ कोडवर्डने मागणी असलेले मॅफेड्रॉनचे शुद्ध रुप प्रामुख्याने परदेशातून येते. पावडर, गोळ्या, द्रव, वायू व इंजेक्शन स्वरूपात मिळणाऱ्या महागड्या ड्रग्जचे उच्चभ्रू तरुण आणि सेलिब्रिटींमध्ये सेवन वाढले आहे.
गुन्ह्यांत वाढ
ड्रग्जच्या आहारी गेलेली व्यक्ती नशेची पूर्तता करण्यासाठी चोरी, मारामारी, फसवणूक यांसह कोणत्याही थराला जाऊ शकते. परिणामी स्ट्रीट क्राइमपासून गंभीर गुन्ह्यांपर्यंत, अगदी खुनासारख्या घटनांमध्येही अंमलीपदार्थांचा सहभाग वाढताना दिसत आहे.
कोट
ड्रग्ज प्रकरणात जळगाव पोलिसांनी गुन्हेशाखेचे खास पथकच तयार केले असून, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत गेल्या सहा महिन्यांत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यात आजवर १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. मानवतेलाच घातक असलेल्या या अंमलीपदार्थाचे सिंडिकेड लवकरच नष्ट करण्यात येईल.
- श्रीकांत धिवरे
जिल्हा पेालिस अधीक्षक, जळगाव.