धुळे : टुडे पान ३ साठी.. मेन
--
फोटो क्रमांक : 28360 - एआय इमेज
--
बायोमेट्रिकमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कळणार ठावठिकाणा
--
पारदर्शक अन् गतिमान प्रशासनासाठी शासनाचा निर्णय; अनास्थेला बसणार चाप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी नेमलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर आता बायोमेट्रिक आणि जीपीएस प्रणालीद्वारे हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे संबंधित अधिकारी नेमक्या कोणत्या गावात कार्यरत आहेत याचा अचूक ठावठिकाणा प्रशासनाला समजणार असून, ग्रामीण प्रशासनातील अनास्थेला चाप बसणार आहे. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी चारही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निर्णयानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात चारही तालुक्यात एकूण ५५७ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींसाठी ४५२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३८० ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांमुळे एकाच ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. एकाच वेळी अनेक गावांचा कारभार सांभाळावा लागत असल्याने संबंधित अधिकारी नेमक्या कोणत्या गावात उपस्थित आहेत, याची माहिती ग्रामस्थांना तातडीने मिळत नव्हती. ग्रामपंचायतीच्या विविध कामांसाठी गावात दाखल झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध नसण्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे दाखल होत होत्या. जन्म-मृत्यू नोंदणी, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, विविध प्रकारचे दाखले, शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांचे अर्ज भरून घेणे यांसारख्या कामांसाठी ग्रामस्थांना नाहक चकरा माराव्या लागत होत्या. अधिकारी भेटत नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडत असल्याच्या तक्रारींवर प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घेतली आहे.
-
तांत्रिक हजेरी प्रणाली
यावर उपाय म्हणून ग्रामविकास विभागाने हजेरी व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक आणि जीपीएस प्रणालीद्वारे हजेरी नोंदवावी लागणार आहे. यामुळे संबंधित अधिकारी कोणत्या ग्रामपंचायतीत उपस्थित आहेत, कामकाजाची वेळ काय आहे आणि ते गावात प्रत्यक्ष उपलब्ध आहेत किंवा नाही, याची वस्तुनिष्ठ माहिती तंत्रज्ञानाद्वारे समजणार आहे. जीपीएस प्रणालीमुळे कर्मचारी कोणत्या भौगोलिक ठिकाणी कार्यरत आहेत, याची खातरजमा करणे प्रशासनाला सोपे होणार आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय अनियमिततेला आळा बसेल आणि अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना योग्य वेळ देऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध राहतील, ज्यामुळे गतिमान सेवेस हातभार लागणार आहे.
-
१४-१
चौकट
१४-१
जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी
तालुका ---------------- मंजूर पदे ------------ कार्यरत पदे
धुळे -----------------------११५------------------१०५
साक्री ---------------------१३८------------------११७
शिंदखेडा ------------------१०४------------------७९
शिरपूर ---------------------९५-------------------७९
एकूण ---------------------४५२------------------३८०