पान तीन
----------------
28649
नाशिक : शोरुमसमोरून कार चोरीप्रकरणी अटक केलेला संशयित. समवेत शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक.
शोरुमच्या सर्व्हिस सेंटरमधून चारचाकी चोरीला
गुन्हेशाखा युनिट दोनकडून २४ तासात शोध; संशयित जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : सातपूर येथील भाविन व्हील्स या महिंद्रा सर्व्हिस सेंटरमधून चोरीस गेलेली महागडी चारचाकी अवघ्या २४ तासांत शोधून काढण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले. याप्रकरणी एका संशयिताला नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. समाधान अंबादास शिरोळे (वय २७, रा. धारणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
उमेश श्रीकांत जोशी (३६, रा. गौळाणे रोड, पाथर्डी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, भाविन व्हीलमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेली पोपट प्रभाकर भागवत यांच्या मालकीची कार (एमएच १५ केआर १४११) मंगळवारी (ता.१) गेटसमोरच पार्क केली होती. सकाळी साडेअकरा ते साडेपाच या दरम्यान ती चोरट्य़ाने चोरून नेली. कार गेटसमोर मिळून आल्याने या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना साहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार व अंमलदार मनोज शिंदे यांना कार चोरी करणारा संशयित नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात वावरत असल्याची खबर मिळाली. युनिट दोनचे प्रभारी साहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून समाधान शिरोळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंगळवारी (ता.१) रागाच्या भरात कार चोरीची कबुली दिली.
सदरची कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, प्रकाश महाजन, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार यांच्या पथकाने केली.