निफाडचा अभिलेख कक्ष स्थलांतरित करा
---
सामाजिक कार्यकर्ते काजळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : निफाड येथील जुन्या तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा कक्ष तातडीने नवीन इमारतीत स्थलांतरित करावा, अशी मागणी कारसूळचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात निफाड तहसील कार्यालय नव्या शासकीय इमारतीत स्थलांतरित होऊन सुमारे चार वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत कार्यालयाचा अभिलेख कक्ष जुन्याच इमारतीत कार्यरत आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. नवीन तहसील कार्यालयापासून अभिलेख कक्ष सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी, नागरिकांना एका कामासाठी दोन शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत. अभिलेख, जुने दस्तावेज, नोंदी अथवा स्वाक्षऱ्यांसाठी जुन्या ठिकाणी जावे लागते. त्यानंतर पुन्हा नवीन तहसील कार्यालयात परतावे लागते. त्यामुळे येत्या पंधरवड्यात हा कक्ष नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात यावा. अन्यथा, लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काजळे यांनी दिला आहे.