पान तीन
--------------
28654
नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसंदर्भात पोलिस आयुत संदीप कर्णिक यांना निवेदन देताना नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, विनायक पांडे, राजेंद्र बागुले, गजानन शेलार, राजेंद्र बागुल, रामसिंग बावरी, पोपटराव नागपुरे, सत्यम खंडाळे आदींसह पदाधिकारी.
गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा
नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाची पोलिस आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात ‘नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळा’च्या वतीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देत विविध सवलती व परवानगी देण्याची मागणी केली आहे. याबाबत महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चर्चा करीत निवेदन दिले.
निवेदनानुसार, सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवून दहा दिवस आधीच परवानग्या देण्याची मागणी केली. तसेच महापालिका, पोलिस, महावितरण, वाहतूक शाखा व अग्निशामक दलाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया सुलभ करावी, अशी भूमिका मांडली. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, कार्यकारी मंडळाचे सदस्य विनायक पांडे, राजेंद्र बागुल, गजानन शेलार, रामसिंग बावरी, पोपटराव नागपुरे, गणेश बर्वे, सत्यम खंडाळे, बबलू परदेशी, अक्षय खांडरे, संदेश फुले, राजेंद्र देसाई, ऋतुराज पांडे, हेमंत जगताप, चैतन्य व्यवहारे आदी उपस्थित होते.
मंडळांच्या प्रमुख मागण्या :
- जुन्या व सलग ३ वर्षे परवाना घेतलेल्या मंडळांना त्वरित परवानगी मिळावी.
- परवानग्यांसाठी कागदपत्रांची अडवणूक न करता एकाच अर्जावर सर्व विभागांच्या मंजुऱ्या दिल्या जाव्यात.
- विसर्जन मिरवणूक शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
- पारंपारिक वाद्य, बँजो, ढोल पथक, म्युझिक सिस्टीम व ऑर्केस्ट्रा वाजविण्यास मान्यता मिळावी.
- रात्री १२ नंतर म्युझिक सिस्टीम बंद करून देखावे व लाईट्स रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी
- शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जागा बदलण्याची गरज भासल्यास मंडळांना परवानगी द्यावी.
- रस्त्यांवरील रबरी गतिरोधक हटवावेत
- आगमन सोहळ्यांच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
- गणेश मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयामार्फत एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.