धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो- NSK26H28661, NSK26H28662
धुळे : महापालिका शाळा क्रमांक-४ येथील क्षेत्रीय कार्यालय.
---
धुळेकरांनो, सेवा- सुविधांसाठी क्षेत्रीय कार्यालयांत जा!
---
महापालिकेतर्फे चार क्षेत्रीय कार्यालये कार्यान्वित; अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : महापालिका प्रशासनाने शहरात चार क्षेत्रीय कार्यालये सुरु केली आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांनी प्रभागातील सुविधांसह समस्या निवारणासाठी आपापल्या प्रभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन धुळे महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
धुळे महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर दहा गावे पूर्णतः महापालिका हद्दीत आली आहेत. गेल्या काही वर्षात शहराच्या चारही बाजूने शहर विस्तारत आहे. त्यामुळे अनेक वसाहती या मुख्य शहरापासून लांब आहेत. येथील नागरिकांना विविध नागरी सुविधा व तक्रारींसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत यावे लागते. त्यामुळे दूर अंतरावर असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालये सुरु करावीत, अशी मागणी नागरिकांसह काही संस्था, संघटनांकडून गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरु होती. काही वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालये सुरू केली. मात्र, नंतर हा प्रयोग फेल झाला. दरम्यान, पुन्हा एकदा मनपा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी यासाठी पुढाकार घेतला. जानेवारी २०२६ मध्ये मांडलेल्या महापालिकेच्या २०२६- २७ च्या अर्थसंकल्पातही क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्याचा संकल्प मांडण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. अखेर शहरातील १९ प्रभागांसाठी चार क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
मनुष्यबळ उपलब्ध
क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी प्रभारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय-१ येथे सहायक आयुक्त किशोर शिंदे, क्षेत्रीय कार्यालय-२ येथे सहायक आयुक्त सागर जकातदार, क्षेत्रीय कार्यालय-३ येथे सहायक आयुक्त राजेंद्र माईनकर व क्षेत्रीय कार्यालय-४ येथे सहायक आयुक्त किशोर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयांमध्ये आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, मालमत्ता कर अशा विविध विभागाच्या कामकाजासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकेका क्षेत्रीय कार्यालयात असे सुमारे ४०-५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे.
नागरिकांना आवाहन
विविध नागरी सुविधा व समस्या निवारणासाठी नागरिकांनी आता महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, मालमत्ता करासंबंधिच्या कामांसाठी आता महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
---
...चौकट...
प्रभागनिहाय क्षेत्रीय कार्यालये अशी
-नवरंग जलकुंभ (आयटीआय कॉलेजजवळ) : प्रभाग- १,२,४,५,६,७
-मनपा शाळा-२ (सुभाषचंद्र बोस पुतळा, जुने धुळे) : प्रभाग-३,१२,१३,१५
-मनपा शाळा-४ (मनोहर टॉकीजजवळ, आग्रारोड) : प्रभाग-११,१४,१६,१८,१९
-अशोक नगर जलकुंभ (लेनिन चौक, फाशी पुल) : प्रभाग-८,९,१०,१७
---