संक्षिप्त
----
परमार्थ निकेतनमध्ये
श्रीकृष्ण जन्मोत्सव
जळगाव : बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांच्या शिकवणीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (ता.४) परमार्थ निकेतन, जळगाव व पिंप्राळा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भजन, श्रीकृष्ण स्मरण व जन्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १२ तसेच रात्री १० ते १२ या वेळेत कार्यक्रम होणार आहे. जळगाव येथे श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, स्टेशन रोड तसेच पिंप्राळा येथे शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर श्री कृष्ण भजन व जन्मसोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आयोजित या भक्तिमय सोहळ्यात भाविकांना श्रीकृष्ण भजनाचा आनंद घेता येणार असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
-------
‘विज्ञान वारी’साठी
आठ विद्यार्थ्यांची निवड
जळगाव : मराठी विज्ञान परिषद (मुंबई) यांच्या वतीने राज्यभरात राबविल्या जाणाऱ्या शनिवारी विज्ञान वारी या विशेष उपक्रमासाठी येथील नूतन मराठा महाविद्यालयातील आठ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी शहरातील चार शाळांमध्ये जाऊन इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी विज्ञानाचे विविध प्रयोग प्रात्यक्षिकासह सादर करून दाखविणार आहेत. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी नुकतेच चाळीसगाव येथील बी. पी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर निवड झालेले विद्यार्थी शहरातील चार शाळांमध्ये दर शनिवारी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील व दैनंदिन विज्ञानाशी निगडित विविध प्रयोग सादर करून दाखविणार आहेत.
--------