जिल्ह्यातील १५ जणांना
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
(उपशीर्षक)
जि. प. शिक्षण विभागाकडून घोषणा; उद्या वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील १५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनी म्हणजे शनिवारी (ता.५) होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाही पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांकडून आलेल्या अर्जाची छाननी करत शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पात्र ठरलेल्या शिक्षकांची निवड करत ही यादी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. यास विभागीय आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांच्याकडून यादी जाहीर करण्यात आली आहे.
चौकट
पुरस्कारप्राप्त शिक्षक
योगेश्वर पाटील (जि.प. शाळा आटोळे, ता. अमळनेर), विलास माळी (महिंदळे, ता. भडगाव), ईश्वर मंडावरे (येवती, ता. बोदवड), नीलेश पाटील (महादेव माळ, ता. भुसावळ), प्रभाबाई पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), हरि बाविस्कर (कुरवेल तावसे बु., ता. चोपडा), मनीषा शिरसाठ (पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव), सोनाली बोरसे (आडगाव, ता. एरंडोल), मनीषा मारकड (भोकर, ता. जळगाव), जुगलकिशोर ढाकरे (रांजणी, ता. जामनेर), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), संजू राठोड (नाचणखेडा, ता. पाचोरा), स्मिता देसले (कराडी, ता. पारोळा), दीपक कोडे (कुसुंबे, ता. रावेर), गिरीश महाजन (हिंगोणे, ता. रावेर).