रेशन दुकानदारांचा सोमवारी एकदिवसीय बंद

रेशन दुकानदारांचा सोमवारी एकदिवसीय बंद
Published on
स्वस्त धान्य दुकानदारांचा सोमवारी एकदिवसीय बंद --- ई-पॉसची समस्या : आंदोलनामुळे लाभार्थींचे होणार हाल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत ई-पॉस मशिनच्या समस्यांबाबत पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकानदारांनी सोमवारी (ता. ७) एकदिवसीय ‘बंद’ची हाक दिली. ऐन सण-उत्सवांच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या आंदोलनामुळे लाभार्थींचे हाल होणार आहेत. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत महिन्याकाठी ई-पॉस मशिनवर शिधापत्रिकाधारकांची अंगठ्याची नोंद घेत धान्य वितरण करण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ई-पॉस मशिनमध्ये अनेक तांत्रिक समस्या येत आहेत. मशिन संथगतीने चालण्यासह वारंवार सर्व्हर डाउन होणे, नेटवर्कच्या समस्येमुळे मशिन बंद पडणे, लाभार्थींना ओटीपी क्रमांक न मिळणे, मशिनवर लाभार्थींचा अंगठा न जुळणे अशा निरनिराळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमुळे स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग उभे ठाकतात. दरम्यान, पुरवठा विभागाकडे या समस्यांबाबत पाठपुरावा करूनही त्या सुटत नसल्याचा अनुभव दुकानदारांना येत आहे. त्यामुळे सरतशेवटी म्हणून ऑल महाराष्ट्र फेयर प्राइज शॉप डीलर्स फेडरेशनने एकदिवसीय धान्य वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, धान्य वितरण व्यवस्था ठप्प पडणार आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com