‘भूमिअभिलेख’चे नऊ कर्मचारी निलंबित
म्हाडा प्रकरण भोवले; महसूलनंतर कारवाईचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : म्हाडा घोटाळ्यात महसूल विभागानंतर भूमिअभिलेख विभागात आता निलंबनाची कारवाई झाली आहे. या विभागातील तब्बल नऊ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी (ता. ३) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात दोन शिरस्तेदार, तीन भूकरमापक, एक पर्यवेक्षक व तिघे इतर कर्मचारी आहेत. म्हाडाप्रकरणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने भूमिअभिलेखसह इतर संबंधित विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बहुचर्चित म्हाडा प्रकरणात राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या चौकशीत दिवसेंदिवस विविध प्रकरणे बाहेर येत असल्याने घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. अशावेळी दोन दिवसांत अगोदर महसूल त्यानंतर आता भूमिअभिलेखमधील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार मनोज शिवदे आणि प्रशांत अढांगळे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पर्यवेक्षक भूमापक सोमकांत जैन, अभिलेेखपाल दीपक गांगुर्डे, भूकरमापक नरेश कांबळे, राजेश वाडकर व सोमनाथ सानप, प्रतिलिपी लिपिक नीलेश कापसे व दफ्तरबंद चंद्रकांत घोडेले यांचा समावेश आहे.
म्हाडाप्रकरणी महसूल व भूमिअभिलेख विभागातील खातेतंर्गत चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासनामार्फत थेट निलंबनाची कारवाई केली जात आहे. दरम्यान, महसूलचे निलंबित मंडळाधिकारी अनिल रोकडे, मोहाडीच्या तलाठी मनीषा पाटील, गंगापूरचे तलाठी शशिकांत चिताळकर व नाशिक शहर-१ तलाठी सागर शेलार यांना त्यांचे शासकीय दफ्तर तत्काळ जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
परजिल्ह्यात हजेरी बंधनकारक
भूमिअभिलेखच्या निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निलंबन कालावधीत सरकारी कामात भाग घेण्यास बंदी असणार आहे. यामधील काही वरिष्ठ अधिकऱ्यांना परजिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असेल. तर काही जणांना जिल्ह्यातंर्गत अन्य तालुक्यांमध्ये जाऊन हजेरी द्यावी लागणार आहे.