धुळे ः टुडे १ साठी
--
धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था
फेडरेशनतर्फे धुळ्यात उद्या शिबिर
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवारी (ता. ५) सकाळी नऊला येथील कांकरिया भवन, नगावबारी चौफुली जवळ, देवपूर, धुळे येथे होणार आहे.
सहकारी पतसंस्थांच्या कामकाजात गतिशीलता आणणे, वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे गटनेते गोपाळराव केले, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा, उपाध्यक्ष डॉ. भास्कर पाटील, कार्यकारी संचालक उदय शिनकर आदी प्रमुख पाहुणे असतील.
प्रशिक्षण सत्रात सुशांत वाडीले (व्यवस्थापकीय संचालक, लिगल ॲण्ड रिकव्हरी, प्रवरा सहकारी बँक) यांचे पतसंस्था व्यवस्थापन, कर्जाची वसुली आणि कायदेशीर शंकांचे समाधान, कमलाकर जोशी (पुणे) यांचे वसुली प्रक्रिया सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती आणि त्याचे लाईव्ह डेमोस्ट्रेशन, जावेद एस. बेपारी (मुंबई) यांचे मार्गदर्शन, तर डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षा या विषयावर विशेष प्रात्यक्षिक होईल. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन फेडरेशनचे सचिव बी. टी. देवरे, रवींद्र वाणी, डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी केले. फेडरेशनचे संचालक, तसेच कर्मचारी गोकुळ पाटील व विलास बोरुडे संयोजन करतील.