फोटो : केशव 28689,90,91,92
‘आदिवासीं’चे आंदोलन मुंबईत धडकणार
अभिजित दीपकेंचा आदिवासी युवकांच्या आंदोलनास पाठिंबा; जंतरमंतरप्रमाणे आवाज उठविण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात १२ दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेले उपोषण स्थगित करून युवकांनी आंदोलन सुरूच ठेवावे. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात वाढवून आपण दिल्लीतील जंतरमंतरप्रमाणे सकल आदिवासींचा मोर्चा थेट मुंबईला घेऊन जाऊ आणि आदिवासी विकासमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू, असा थेट इशारा देत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी (ता. ३) आदिवासी युवकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ ‘सीजेपी’चे संस्थापक दीपके यांनी आदिवासी उपोषणकर्ते व आंदोलकांची भेट घेतली. दुपारी दीडला ठाकरेंनी येथे भेट दिल्यानंतर अवघ्या पाच तासांनी दीपके ईदगाह मैदानावर दाखल झाले. दीपके यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. दोन वर्षांत ५९० विद्यार्थ्यांचा वसतिगृहात मृत्यू झाला. त्याची चौकशी व्हायला हवी. मंत्री उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले आणि हसत-हसत गाडीत बसून निघून गेले. तुमच्या मुलीला सर्पदंश झाला असता, तर तुम्ही असेच हसत गेला असता का? असा प्रश्न दीपकेंनी उपस्थित केला.
ग्रामीण भागातील शाळा, वसतिगृहांमध्ये पुरविला जाणारा पोषण आहार शिजविल्यानंतर १२ तासांनी विद्यार्थ्यांना दिला जातो. इतका शिळा व सडलेला आहार तुम्ही (मंत्री) स्वत:च्या मुलांना द्याल का? मंत्र्यांची कुत्री ‘एसी’मध्ये राहतात. पण आदिवासी मुले जनावरांसारखे आयुष्य जगतात. त्यांना चांगले जगण्याचा अधिकार आपण कधी देणार आहोत? ८० वर्षांत आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. पण आता यापुढे हा युवक शांत बसणार नाही. आपल्या हक्कांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरावे लागेल. त्यासाठी राज्यातील सर्व आदिवासी युवकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे. उपोषण करून जीव देण्यापेक्षा आपल्या अधिकारांसाठी दिल्लीतील जंतरमंतरप्रमाणे मुंबईत आंदोलन उभे करू. आदिवासी बांधवांचे आंदोलन हे तुमच्या नेतृत्त्वात होईल, असे नियोजन करा. त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि आपण सोबतच मुंबईत जाऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
आश्रमशाळांना अचानक भेटी
राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पोलखोल केल्यानंतर अभिजित दीपके यांनी आपला मोर्चा आता आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांकडे वळविला आहे. या शाळांमध्ये ‘सरप्राईज व्हिजिट’ करून त्याची पोलखोल करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दीपकेंचे सरकारला ‘आव्हान’
- तुमची मुले कुठल्या शासकीय शाळेत शिकली ते सांगा?
- पन्नास शासकीय शाळांमधे आपण सोबत भेट देऊन येथील सुविधांची पाहणी करू
- आश्रमशाळेत जेवण करा, मुक्कामी राहा आणि तेथील शौचालय वापरून दाखवा
- अधिकाऱ्यांनी एक दिवस उपोषण करून दाखवावे, ‘एसी’बाहेर फिरून दाखवा
- मुख्यमंत्र्यांची मुले कुठल्या शासकीय शाळेत शिकली?