शिक्षण दिन विशेष : पदवीधर शिक्षक विवेक खैरनार

शिक्षण दिन विशेष : पदवीधर शिक्षक विवेक खैरनार
Published on
लोगो : गुरूंच्या ध्यासाची गाथा फोटो : (28703) फिरत्या प्रयोगशाळेतून विज्ञानाची गोडी विवेक खैरनार यांच्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : विज्ञानाचा प्रयोग म्हटले, की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होते. प्रयोगशाळा कुठे मिळणार, आवश्यक साहित्य कसे मिळवायचे आणि ते योग्य पद्धतीने कसे हाताळायचे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. मात्र, महादेवपूर येथील पदवीधर शिक्षक विवेक खैरनार यांनी या प्रश्नांवरच एक अभिनव उत्तर शोधले आहे, ते म्हणजे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा.’ विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचावे आणि प्रयोगातून शिकण्याची गोडी त्यांच्या मनात रुजावी, या ध्यासातून खैरनार यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. छोट्या-छोट्या, सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखविले जातात. सुरुवातीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करणारी मुले हळूहळू स्वतःहून प्रयोग करू लागतात आणि विज्ञानाची भीती कधी उत्सुकतेत बदलते, हे त्यांनाही कळत नाही. या उपक्रमासाठी खैरनार यांनी पुण्यातील ‘आयसर’मध्ये ‘स्टेम’चे विशेष प्रशिक्षण घेतले. त्या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिकण्याची एक वेगळीच वाट खुली केली. मात्र, त्यांचा शिक्षणाचा प्रवास केवळ विज्ञानापुरता मर्यादित राहिला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत त्यांनी खान ॲकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण व प्रशिक्षणाची जोड दिली. एखादा घटक शिकवून झाल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. योग्य उत्तरे आणि सातत्यपूर्ण सहभागातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत जातो. शाळा की रिसॉर्ट? चांगल्या शिक्षणासाठी केवळ चांगला शिक्षक पुरेसा नसतो; तर शाळेचे वातावरणही प्रेरणादायी असावे लागते, हा विचार खैरनार यांनी कृतीतून सिद्ध केला. विविध घटकांच्या सहकार्याने शाळेची इमारत आकर्षक आणि सुसज्ज करण्यात आली. आज या शाळेचे रूप पाहिले, की ती एखाद्या रिसॉर्टलाही लाजवेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुटीच्या काळातही विद्यार्थ्यांचा शाळेशी संवाद कायम राहावा म्हणून येथे कवायत, गायन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम घेतले जातात. शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘ग्रंथ तुमच्या दारी’तून वाचनाची गोडी विज्ञानाबरोबरच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ‘विश्वास ज्ञान वाचनालया’च्या माध्यमातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही संकल्पनाही प्रभावीपणे राबविली जात आहे. तब्बल १०० पुस्तकांचा संच शाळेत पाठविला जातो. विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी दिली जातात आणि वाचनानंतर ती पुन्हा जमा केली जातात. अशा प्रकारे सुमारे दीड लाख बालशैक्षणिक साहित्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली असून, ज्ञानाची नवी दारे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. पहिली ते सातवीपर्यंत सुमारे १५० विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेत आता शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. विज्ञानातील प्रयोगशीलता, वाचनाची आवड, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम येथे दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये होणारा हा सर्वांगीण बदलच समाजासाठी महत्त्वाचा असल्याचे विवेक खैरनार सांगतात. या प्रवासात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मिळणारे प्रोत्साहन हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याची भावना ते आवर्जून व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com