सिंहस्थासाठी ८४ धार्मिक संस्थांची नोंदणी

सिंहस्थासाठी ८४ धार्मिक संस्थांची नोंदणी
Published on
पायाभूत सुविधांसाठी ८४ धार्मिक संस्थांचे अर्ज सिंहस्थ कुंभमेळा : समित्यांमार्फत पडताळणी; ५.६८ कोटींची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : राज्य सरकारतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविक व दर्शनार्थींची सेवा देणाऱ्या धार्मिक, तसेच सेवाभावी संस्थांना १५ लाखांपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सुविधांसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे पहिल्या टप्प्यात ८४ धार्मिक संस्थांनी नोंदणी केली आहे. प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यात भाविकांना सेवा देणाऱ्या धार्मिक व सेवाभावी संस्थांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. या सुविधांच्या उपलब्धतेसाठी संस्थांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ८४ संस्थांनी डिजिटल प्रणालीद्वारे अर्ज दाखल केले आहेत. ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत अर्जांची पडताळणी करीत आहेत. पडताळणीनंतर अभिप्रायासह प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...या संस्थांचे अर्ज प्राप्त संस्थान : ४५ आश्रम : १३ आखाडे : १२ मंदिरे : ६ मठ : ५ इतर संस्था : ३ --- नाशिकच्या ७१ संस्था ऑनलाइन अर्जांमध्ये ८४ संस्थांपैकी ७१ संस्था जिल्ह्यातील आहेत. त्यात नाशिक तालुक्यातील ३५ व त्र्यंबकेश्वरच्या २० संस्थांचा समावेश आहे. तसेच सिन्नर- पाच, इगतपुरी- चार, मालेगाव- दोन, चांदवड- दोन, दिंडोरी, निफाड आणि कळवण तालुक्यांतील संस्थांनीही नोंदणी केली आहे. परजिल्हा व महाराष्ट्राबाहेरील १३ संस्थांनीही नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या संस्थांमध्ये शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान, प्रयागराजचे पीठ, अहमदाबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील आखाडा, तसेच पुणे, ठाणे, नंदुरबार व जळगाव येथील संस्था आहेत. ४.४८ कोटी भाविकांचा अंदाज नोंदणी केलेल्या संस्थांनी सिंहस्थ कालावधीत ४.४८ कोटींपेक्षा अधिक भाविकांच्या उपस्थितीचा व ८.१५ कोटींपेक्षा अधिक मुक्कामी भाविकांचा अंदाज वर्तविला आहे. नोंदणी केलेल्या संस्थांपैकी ३१ संस्थांनी पायाभूत सोयी-सुविधांची मागणी केली असून, त्यासाठी अंदाजे पाच कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com