धुळे ः टुडे ४ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 28753
धुळे : वाडी- शेवाडी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते.
--
वाडी-शेवाडी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा
--
पालकमंत्री रावल : मोझे- वाडीकरांचे पुनर्वसित गावठाणात शंभर टक्के स्थलांतर
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : वाडी- शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देऊन त्यांना नियमानुसार सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाणात घरांसाठी भूखंड देण्यात आले असून, त्यांच्या बाधित घरांचा आर्थिक मोबदलाही देण्यात आला आहे. अशा सर्व पात्र प्रकल्पबाधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. तसेच पुनर्वसन, भूसंपादन व मोबदल्याशी संबंधित उर्वरित प्रश्न समन्वयातून मार्गी लावावेत, असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
-
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पाच्या पुनर्वसन कामांबाबत पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संजय बागडे, प्रांताधिकार, तहसीलदार, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, बाजार समिती सभापती नारायण पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.
-
मोझे-वाडीचे स्थलांतर
पालकमंत्री रावल म्हणाले, की प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या कुटुंबांना देय लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पात्र प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. अशा प्रकल्पबाधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याच्या अनुषंगाने पात्रतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत मोझे-वाडी आणि मोझे- दिवी या दोन गावांचे नवीन गावठाणात पुनर्वसन करण्यात आले आहे. तरतुदीनुसार देय असलेल्या १८ नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मोझे- वाडी येथे २७६ आणि मोझे- दिवी येथे ४४८, अशी एकूण ७२४ बाधित कुटुंबे आहेत. मोझे- वाडी येथील प्रकल्पग्रस्तांचे नवीन पुनर्वसित गावठाणात १०० टक्के स्थलांतर पूर्ण झाले आहे. मोझे-दिवी येथील ३० कुटुंबांचे नवीन पुनर्वसित गावठाणात स्थलांतर झाले असून, उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. या कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देत पुढील प्रक्रिया सुलभ करावी.
-
समन्वयातून कार्यवाही
पुनर्वसित गावठाणातील कुटुंबांना आवश्यक नागरी सुविधा, देय लाभ उपलब्ध करावे. प्रकल्पबाधितांच्या मोबदल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये जलसंपदा, महसूल व पुनर्वसन विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. प्रकल्पबाधितांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करण्याची वेळ येऊ नये, यादृष्टीने विभागांनी समन्वय साधावा. वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पाच्या उर्वरित मुख्य कालव्याच्या काही भागातील भूसंपादनाशी संबंधित बाबींचाही आढावा घेण्यात आला. उजवा कालवा वितरिका क्रमांक २, शेत वितरिका क्रमांक ५ व ६ तसेच वितरिका क्रमांक ३ परिसरातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या मोबदल्याशी संबंधित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. भूसंपादन आणि मोबदल्याच्या प्रश्नांवर संबंधित शेतकरी व प्रकल्पबाधितांशी संवाद साधून नियमानुसार सकारात्मक मार्ग काढावा, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
सिंचनाचा १६ गावांना लाभ
शेवाडेजवळ बुराई नदीवर वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प २०१५ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील १२ आणि धुळे तालुक्यातील चार, अशा एकूण १६ गावांना सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता सात हजार १७६ हेक्टर असून, पैकी चार हजार ७५१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. उर्वरित सिंचन क्षमता दोन हजार ४२५ हेक्टर आहे. २०२६-२७ मध्ये एक हजार ४१२ हेक्टर सिंचन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाचा निर्मित जलसाठा ३६.१३ दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्पाची मंजूर किंमत ३८८.५६ कोटी असून जुलै २०२६ अखेर ३५१.३२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०२६-२७ साठी २५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. उपलब्ध निधीतून सिंचन क्षमता अधिकाधिक उपयोगात आणण्यासाठी नियोजन करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.
-