फोटो : H28760, H28762, H28763
-
क्रिकेटच्या पंच समितीवर अमृता, प्रियांकाची निवड
पहिल्यांदाच नाशिकच्या दोन महिला नियुक्त; मधुराचेही यश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत नाशिकच्या अमृता गाडगीळ, प्रियांका घोडके व किशोरवयीन मधुरा दायमा यांनी यश मिळवले आहे. २०२५-२६ च्या हंगामात खास महिलांसाठी झालेल्या पात्रता, लेखी, प्रात्यक्षिक व त्यानंतरच्या तोंडी परीक्षा घेतली.
गाडगीळ यांनी एकूण ८५.३३ टक्के गुण मिळवले. प्रियांका घोडकेने ८५ टक्के व मधुरा दायमा ८०.६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. गाडगीळ या निवेक क्लबवर क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. क्रिकेटपटू प्रियांका सक्रिय खेळाडू असून नाशिक जिल्हा महिला वरिष्ठ संघाच्या कर्णधार आहेत. गेली बरीच वर्षे त्यांनी विविध वयोगटात जिल्हा तसेच महाराष्ट्राचेदेखील प्रतिनिधित्व केले आहे. मधुरादेखील १९ वर्षांखालील नाशिक जिल्हा संघ व राज्याकडून खेळते. नाशिकच्या प्रियांका व अमृता या दोनही महिला पंचांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समितीवर नियुक्ती झाली आहे. मधुरा दायमाला मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ही संधी मिळेल.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समितीवर २०२३ पासून सातत्याने दरवर्षी नाशिकमधील चार-पाच जणांची निवड होत आहे. एमसीए पॅनलवर नियुक्त झालेल्या नाशिकमधील या पहिल्याच महिला क्रिकेट पंच असाव्या. यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, महाराष्ट्रभर दरवर्षी नियमितपणे होणाऱ्या, राज्यस्तरीय खुल्या तसेच विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत पंचगिरीसाठी त्यांना प्राधान्य मिळेल. या तिघींना आंतरराष्ट्रीय सामन्यातील अनुभवी पंच व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच समिती प्रमुख विनीत कुलकर्णी, रणजी सामन्यातील पंच संदीप गांगुर्डे, संदीप चव्हाण, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच समिती सदस्य अजय देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेतील यशाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.