दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून
आई-वडिलांनीच आवळला गळा
मोहाडी येथील ‘त्या’ आत्महत्येचा बनाव उघड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : मोहाडी (ता. जि. जळगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या आत्महत्येच्या घटनेला धक्कादायक आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. ३१ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास राधेश्याम हरचंद राठोड (वय २६) याने दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केली होती. याबाबत सुरुवातीला एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.
पोलिसांना तपासादरम्यान सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला. ही आत्महत्या नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले. चक्क जन्मदात्या आई-वडील आणि भावानेच संगनमत करून तरुणाचा खून केला आणि त्याला आत्महत्येचे रूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा बनाव रचला होता. मृत राधेश्याम राठोड याला दारूचे व्यसन होते. तो रोज दारूच्या नशेत घरी येऊन आई-वडील व भावाला मारहाण करीत असे. त्याच्या या दैनंदिन छळ आणि त्रासाला संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कंटाळले होते. या त्रासातून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी संशयितांनी राधेश्यामचा काटा काढण्याचा कट रचला.
पुरावा नष्ट करण्यासाठी जाळली दोरी
३१ जुलैला दुपारी संशयितांनी संगनमत करून राधेश्याम यास दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन जागीच ठार मारले. खून केल्यानंतर संशयितांनी ज्या दोरीने गळफास दिला, ती दोरी तत्काळ जाळून टाकून त्यांनी खुनाचा मुख्य पुरावा नष्ट केला. नंतर राधेश्यामने स्वतःच आत्महत्या केली, असा खोटा कांगावा करत पोलिसांना खोटी माहिती दिली आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला आत्महत्येचा प्रकार वाटत असला, तरी पोलिसांना संशय आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत, बारकाईने केलेल्या चौकशीत संशयितांचा खोटा बनाव कोसळला. तपासाअंती हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना अटक केली आहे.