वाटिकाश्रम परिसरात घरफोडी;
३२ हजारांचा ऐवज लंपास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.४ : कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दोन अंगठ्यांसह चांदीची मूर्ती, कुयरी व दिवा असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना वाटिकाश्रम परिसरात २३ ऑगस्टला उघडकीस आली. याप्रकरणी ३ सप्टेंबरला तालुका पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटिकाश्रम परिसरातील रहिवासी शिवाजी बळीराम पाटील (वय ६३) हे २१ ऑगस्टला पत्नीसह सुरत येथे भावाकडे गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती, चांदीची कुयरी व चांदीचा दिवा असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी शेजाऱ्यांनी पाटील यांना घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पाटील घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी याबाबत ३ सप्टेंबरला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी धनराज पाटील तपास करीत आहेत.