फोटो : H28764,H28765
--
‘एआय’ माहिती देईल, पण शिक्षणाचे महत्त्व अबाधित
प्रा. डॉ. बाविस्कर : दाभोलकर व्याख्यानमालेत प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : शिक्षणाचा मुख्य उद्देश फक्त माहिती पुरवणे नसून मानवी संवेदना आणि लोकशाहीची मूल्ये जपणे हा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माहिती पुरवू शकते, परंतु शिक्षणाचे मूलभूत वास्तव कधीही बाद करू शकत नाही, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या विस्तारित कार्यक्रमात ते बोलत होते. केटीएचएम महाविद्यालयाच्या व्हीएलसी हॉलमध्ये शुक्रवारी (ता. ४) कार्यक्रम झाला. ‘लोकशाही आणि शिक्षण’ विषयावर बावीस्कर यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि लोकशाहीच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी शिक्षण, शिक्षक आणि समाज यांच्यातील संबंधांवर सडेतोड विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, एआय हे केवळ एक साधन आहे, साध्य नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे संवेदनशील वातावरण तयार करणे हेच शिक्षकांचे खरे कर्तव्य आहे. लोकशाही राज्यसंस्था नसून एक भावना आहे. या भावनेचे रूपांतर विचारात आणि विचारांचे रूपांतर कृतिशीलतेत करणे हा शिक्षणाचा मुख्य रोल आहे. प्राचार्या प्रा. डॉ. कल्पना अहिरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी केले. प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर डुबे यांनी आभार मानले.
--
लोकशाहीला मारक प्रवृत्ती घातक
केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे; जंतर-मंतरसारख्या ठिकाणी होणारे आंदोलन आणि विद्यानंद बापट यांच्यासारख्या विचारांतून समाज अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध होते. राज्यसंस्था ही आंधळी असते आणि ती कोणाच्या हातात आहे यावरून तिचे चरित्र ठरते. आज लोकशाहीला मारक ठरणाऱ्या प्रवृत्तींपेक्षा, समाज आणि राज्यसंस्था यातील ‘मध्यवर्ती ढाचा’ आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेने केवळ माहिती न देता विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही विचार आणि मानवी मूल्ये रुजवावीत, असा संदेश प्रा. बाविस्कर यांनी दिला.
---------