बसचालकाला जखमी
करणाऱ्यास सश्रम कारावास
---
नंदुरबार न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : बसचालकाला दगड मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिना सक्षम कारावासाची शिक्षा, तसेच १० हजारांचा दंड ठोठवण्यात आला. दंडाच्या रकमेतून बसचालकास आठ हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.
नंदुरबार आगाराचे बसचालक देवा नामदेव गावित (वय ५२, रा. अजेपूर, ता. जि. नंदुरबार) १९ जुलै २०२५ ला नंदुरबार- खोलघर बस घेऊन नंदुरबारकडे परतत होते. केवडीपड्याजवळ मंगू सजन जगताप (खोलघर ता. नवापूर) बसच्या मागील शिडीवर चढल्याचे दिसले. मंगूजवळ पैसे नसावेत, असे समजून त्यास बसमध्ये बसविले. त्यानंतर मंगूने बसमधील प्रवासी महिलेला मारहाण केली. याबाबत जाब विचारला असता, ती महिला बायको असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यास बसखाली उतरविण्यात आले. या रागातून मंगूने बसचालक देवा गावित यांना दगड मारून दुखापत केली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसात मंगूविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार अशोक बहीरम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. भावसार यांच्यासमोर झाली. सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी मंगू जगतापविरुध्द गुन्हा सिद्ध झाला. त्यास मुख्य न्यायदंडाधिकारी भावसार यांनी सहा महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बसचालक देवा गावित यांना दंडाच्या रकमेतून ८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एम.ए. सय्यद यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक योगिता राठोड व सुनील भामरे, पैरवी अंमलदार म्हणून हवालदार गणेश धनगर, शैलेंद्र जाधव आणि कर्मचारी भावना पाटील यांनी काम पाहिले.