महापालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
विविध माध्यमांतील शिक्षकांचा गौरव, लवकरच सत्कार समारंभाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : महापालिका शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा झाली आहे. पुरस्कारार्थींमध्ये विविध माध्यमांतील शिक्षक, मुख्याध्यापकांचा समावेश आहे. लवकरच पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.
गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शालेय उपक्रमांमधील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन संबंधित शिक्षकांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. महापालिका संचलित ८८ प्राथमिक शाळा, १२ माध्यमिक शाळा तसेच मनपा क्षेत्रातील १६४ खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधून पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले होते. यामध्ये मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमांच्या शाळांमधून प्राथमिक व माध्यमिक स्तरावरून शिक्षण विभागाकडे प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांची काटेकोर व पारदर्शक पडताळणी करण्यासाठी विशेष मूल्यांकन समिती गठित केली होती. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) अधिव्याख्याते, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी, खासगी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आणि महापालिका शिक्षण पर्यवेक्षक यांचा समावेश होता. या पथकाने प्रत्यक्ष शाळा व वर्गांना भेटी देऊन शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम व कामकाजाचे सविस्तर मूल्यमापन करून गुणदान नोंदवले. या गुणदानाच्या आधारे अंतिम पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.
यात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील उपशिक्षक व मुख्याध्यापकांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या नाशिक महापालिकेच्या उपशिक्षिका कुंदा बच्छाव यांचाही यानिमित्त सत्कार केला जाणार आहे.
---चौकट
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी
रंजना मांडे (मनपा शाळा क्र ७८, अंबड), ज्योती भागवत (मनपा शाळा क्र. २१, कार्बन नाका), संगीता आढाव (मनपा शाळा क्र. ४९, पंचक), संध्या जाधव (मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक), शोभा मगर (मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक), योगेश सूर्यवंशी (मनपा शाळा क्र. ७४, जाधव संकुल), नाझ खान (मनपा शाळा क्र. ८४, वडाळागाव), तबस्सुम शेख (मनपा शाळा क्र. ८४, वडाळागाव), राजश्री सोनेरी (मनपा शाळा क्र. १३, दिंडोरी नाका), सचिन चिखले (मनपा शाळा क्र. २७, सातपूर कॉलनी), दिलीप गावित (बी. डी. भालेकर, नाशिक), अर्चना कापडणीस (म्हसरुळ, नाशिक), रंजना पाटील (अभिनव बालविकास मंदिर, नाशिक) यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.