धुळे ः टुडे १ साठी, मेन (चार कॉलमात घेणे.......त्याखाली संक्षीप्त पट्टा घेणे)
--
लोगो छायाचित्र ः वाळूचे घेणे
--
वाळूचा बेसुमार उपसा
--
पांझरा, बुराई नदीपात्रातून संगनमताने तस्करी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : महसूल यंत्रणेशी संधान साधत आणि पर्यावरण रक्षणासंबंधी सर्व नियम पादळी तुडवून पांझरा आणि बुराई नदीपात्रातून बेडर तस्करांकडून वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे यंत्रणेचे दुर्लक्ष तस्करांच्या पथ्यावर पडत आहे. वास्तविक पावसाळ्यामुळे तरतुदीनुसार वाळू उपसा बंद असतानाही राज्य शासनाच्या नाकावर टिच्चून तस्कर वाळू चोरीतून रग्गड कमाई करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालिचा रोष निर्माण होत असून, लोकप्रतिनिधींचेही सोईस्कर दुर्लक्ष पर्यावरण संतुलनाच्या नियमावलीला बाधा ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
-
धुळे तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या न्याहळोद, कुसुंबा, आनंदखेडे, नेर आणि शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी क्षेत्रातील चिमठाणे भागातून वाळूचा सर्रास बेसुमार उपसा सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्य शासनाच्या अधिकृत वाळू धोरणानुसार दरवर्षी १० जून ते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ मानला जातो आणि या चार महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या नदीपात्रातून वाळू उपशाची (उत्खनन) परवानगी दिली जात नाही. पावसाळ्यात वाळू उपसा केल्यास नदीचे पात्राचे नुकसान होते, पाण्याचा प्रवाह बदलतो आणि किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वन्यजीव आणि नदीतील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय हरीत न्यायाधीकरणाच्या नियमानुसार पावसाळ्यात उत्खनन थांबवणे अनिवार्य असते.
-
धुळे तालुक्यात चोरी
असे नियम बेडर तस्करांनी पायदळी तुडवून आणि महसूल यंत्रणेशी संधान साधत पांझरा आणि बुराई नदीपात्राला लक्ष्य केले आहे. न्याहळोद येथील मोठे पात्र असलेल्या पांझरा नदीतून रोज सरासरी ४० ते ५० ट्रक्टरव्दारे बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे. यात न्याहळोद, कौठळ, बिलाडी, वरखेडे, कुंडाणे, अर्णी, बाळापूर, निमखेडी, हेंकळवाडी, जापी, निमडाळे, नगाव, तामसवाडी आदी ठिकाणचे ट्रक्टर पांझरा नदीपात्रातून वाळूचा वारेमाप उपसा करत आहेत. अशीच गंभीर स्थिती कुसुंबा, नेर, आनंदखेडे शिवारातील पांझरा नदीपात्रास्थळी आहे. या क्षेत्रातील काही गावांमधून पुरविल्या जाणाऱ्या असंख्य ट्रक्टरव्दारे वाळूचा उपसा केला जात आहे.
-
बुराई नदीपात्रही लक्ष्य
बुराई नदीपात्रालगत चिमठाणे येथूनही वाळूची खुलेआम चोरी केली जात आहे. या ठिकाणी देखील रोज सरासरी ४० ते ५० ट्रक्टर वाळू चोरीच्या कामात गुंतले आहेत. यात चिमठाणे, दराणे, रोहाणे, शेवाडे, बाभुळदे, निशाने (ता. शिंदखेडा), लामकानी (ता. धुळे) येथील ट्रक्टरव्दारे वाळूचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस पाटील, तलाठी, मंडळाधिकारी, तसेच अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थापन झालेली भरारी पथके या गंभीर स्थितीकडे कुठल्या कारणामुळे दुर्लक्ष करत आहेत?, असा प्रश्न अनेक ग्रामस्थांना सतावतो आहे. (क्रमशः)
-
१४-१
...चौकट...
१४-१
राज्य शासनाचा आदेश धुडकावला
पावसाळ्यात लिलाव किंवा सरकारी परवाने बंद असल्याने जर कोणी वाळू उपसा करत असेल, तर तो पूर्णपणे अवैध (बेकायदेशीर) मानला जातो. राज्य शासनाने व महसूल विभागाने अशा बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय दक्षता व भरारी पथके तैनात केली आहेत. या बंदीच्या काळात अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक करताना आढळल्यास थेट गुन्हा नोंदवण्याचे आणि वाहनांचे परवाने जागेवरच रद्द करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, हा आदेश जिल्ह्यात उघडपणे धुडकावला जात असल्याचे चित्र वाळू तस्करीच्या घटनांमधून समोर येत आहे.