NSK26H28824 : मयंक पंड्या
---
नंदुरबारात ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या
---
मयंकने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. ३) रात्री गांधीनगर कॉलनीत घडली. मयंक पंड्या असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो राजस्थानमधील रहिवासी आहे. परीक्षेच्या एक दिवसापूर्वीच मयंकने जीवनयात्रा संपविली.
मयंक हरिशंकर पंड्या ((वय २१, मुळ रा. सलूंबर, जि. उदयपूर, राजस्थान) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. शहरातील धुळे रस्त्यावर असलेल्या गांधीनगर कॉलनीत एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत तो एकटा राहत होता. मयंकने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी रात्री साडेअकरा ते बारादरम्यान मिळाली. नंदुरबार शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयंक पंख्याला बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. शुक्रवारी (ता. ४) येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याबाबत नंदुरबार शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
दरवाजा तोडून प्रवेश
गुरुवारी अनेक तासांपासून मयंक कोणाला दिसला नव्हता. त्याच्याशेजारी राहत असलेल्या मित्राने रात्री दहाच्या सुमारास दरवाजा वाजवून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. खोलीत डोकावण्याचा प्रयत्न केला असता, मित्रांना मयंंक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मित्रांनी शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्राध्यापकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करावा लागला.
मयंकचा मोबाईल ताब्यात
मयंक अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी होता. परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. ७०० पैकी ६६० गुण मिळवून त्याने रेकॉर्ड केले होते. शुक्रवारपासून परीक्षा सुरू होणार असल्यानेे त्याची तयारी सुरू होती. मग त्याने अचानक असे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी मयंकचा मोबाईल ताब्यात घेतला असून, घटनेपूर्वी तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, याची माहिती पोलिस घेत आहेत.
वडील सहायक गटविकास अधिकारी
मयंक राहत असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सहा खोल्यांमध्ये विद्यार्थी राहत होते. मयंक त्याच्या खोलीत सतत अभ्यासात व्यस्त असायचा. शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून मयंकची ओळख होती. त्याचे वडील हरिशंकर पंड्या राजस्थानातील सराडा पंचायत समितीत सहायक गटविकास अधिकारी आहेत. मयंकचा सहकारी शिवकुमार आणि महाविद्यालयातर्फे डॉ. नीलेश तुकाराम यांनी आईवडिलांना घटनेची माहिती दिली. त्यावरून हरिशंकर पंड्या नातेवाइकांसह नंदुरबारात दाखल झाले होते.