शेतकऱ्यांनी नफा केंद्रित शेतीकडे वळावे
ॲड. जयस्वाल : आधुनिक शेती प्रशिक्षण शिबिर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : शेतीमध्ये बाजारपेठेची गरज, मागणी, प्रक्रिया व मूल्यवर्धनाचा विचार करून ‘काय पिकवायचे, कुठे विकायचे व बाजारात मागणी किती आहे’, याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पिकांचे विविधीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेती अधिक नफाकेंद्रित होईल, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
आत्मातंर्गत महिरावणी येथे गुरुवारी (ता. ३) रेशीम उद्योग व तुती लागवडविषयक प्रशिक्षण, आधुनिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ॲड. जयस्वाल बोलत होते.
ॲड. जयस्वाल म्हणाले, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे व कांदा याप्रमाणे स्थानिक भौगोलिक व हवामान परिस्थितीनुसार पिकांची निवड करून त्या भागाची कृषी ओळख अधिक सक्षमीकरणाची गरज आहे. विज्ञानाधारित शेतीवर भर, बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार लक्षात घेता शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित व तंत्रज्ञानस्नेही शेतीचा स्वीकार करावा. या वेळी त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर करण्याची गरजही अधोरेखित केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ यांच्यासह शेतकरी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
विविध योजनांचा लाभ
शेतकऱ्यांना या वेळी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषी अवजारे, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आदींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच ॲड. जयस्वाल यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे आणि रेशीम उद्योगातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.