धुळे ः टुडे २ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 28822....जयकुमार रावल
--
जिल्ह्यात ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ धोरण राबविणार
-
पालकमंत्री रावल : पुढील १०० दिवसांत प्रभावी मोहीम; ‘ड्रग फ्री धुळे’ उद्दीष्ट
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त व सक्षम युवा पिढीच्या संकल्पनेला बळ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ धोरण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांना कोणत्याही स्वरूपात थारा न देता पुढील १०० दिवसांत गतिमान आणि परिणामकारक मोहीम राबवावी. आगामी काळात ‘आमचा धुळे जिल्हा ड्रग-फ्री आहे’, असे आत्मविश्वासाने सांगता येईल, अशी स्थिती निर्माण करणे हे सर्व यंत्रणांचे सामूहिक उद्दिष्ट असावे, असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
-
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ड्रग-फ्री धुळे जिल्हा’ अभियानाच्या अनुषंगाने आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत पालकमंत्री रावल बोलत होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
-
कठोर भूमिका स्वीकारली
पालकमंत्री रावल म्हणाले, की विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीला महत्त्वाचे स्थान असून, ही पिढी निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त ठेवणे ही शासन, प्रशासन, कुटुंब आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. त्याच धर्तीवर धुळे जिल्ह्यातही अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, तस्करी आणि अवैध लागवडीविरोधात प्रभावी कारवाई करावी. अमली पदार्थांचा प्रश्न केवळ पोलिस विभागापुरता मर्यादित नसून, महसूल, पोलिस, कृषी, वन, शिक्षण, आरोग्य, नगरविकास व परिवहन या सर्व विभागांनी ‘होल ऑफ द गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून कालबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
-
सीमावर्ती भागांवर नजर
जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमा लागून असल्याने तस्करीविरोधात अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. प्रमुख महामार्ग, रेल्वेमार्ग आणि प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष ठेवून आंतरराज्य यंत्रणांच्या समन्वयाने अमली पदार्थांच्या वाहतुकीला सीमांवरच प्रतिबंध करावा. तसेच केवळ जप्तीवर न थांबता प्रकरणाच्या मुळाशी जात पुरवठादार, तस्कर आणि संपूर्ण वितरण साखळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बेकायदेशीर गांजा लागवडीमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासही त्यांनी सांगितले.
-
हलगर्जीपणा खपवून नका
या मोहिमेत हलगर्जीपणा किंवा कसलाहीशीर अजिबात खपवून घेतला जाणार नाही. अमली पदार्थांच्या व्यवसायाला मदत किंवा संरक्षण दिल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर निलंबनासह कठोर विभागीय व कायदेशीर (एनडीपीएस कायद्यानुसार) कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच सायकोट्रॉपिक पदार्थ आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय होणाऱ्या औषधांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आरोग्य आणि औषध प्रशासनाने तपासणी वाढवावी, असेही ते म्हणाले.
-
लोकचळवळ व्हावी
धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तरुण हा देशाचे भविष्य आहे. त्यांचे आयुष्य अमली पदार्थांच्या विळख्यात उद्ध्वस्त होऊ देणार नाही. प्रशासन कठोर कारवाई करेल; मात्र घराघरातून जागरूकता आणि समाजातून सक्रिय साथ मिळाल्यासच आपण ही लढाई जिंकू शकतो. सुरक्षित धुळ्यासाठी ‘ड्रग-फ्री धुळे’ ही प्रत्येक नागरिकाची चळवळ बनवूया, असे भावनिक आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
शाळा-महाविद्यालय परिसर ‘ड्रग-फ्री’
युवा पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करावे. येत्या दोन आठवड्यांत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करावी. प्रत्येक परिसर ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ करण्यासाठी संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि पालकांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाची मदत उपलब्ध करून देण्यावरही भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री रावल यांनी अधिकारी वर्गाला दिले.
-