जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सुधाकर मोरे निलंबित
कामकाजातील तक्रारींची शासनाकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांना शासनाने निलंबित केले आहे. त्याच्याविषयी प्राप्त तक्रारींच्या आधारे आरोग्य विभागाने ही कारवाई केल्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागूल यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी नाशिक जिल्हा दौरा केला. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना ‘सरप्राईज व्हिजीट’ करत येथील सुविधांची पाहणी केली. कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी मंत्री आंबिटकर यांच्याकडे डॉ.मोरे यांच्या वर्तणुकीविषयी तक्रार करत त्यांची बदली करण्याची मागणी केली होती. वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाने १५ दिवसांपूर्वी त्यांना नोटीस बजाविली होती. त्यावर डॉ. मोरे यांनी खुलासा देखील केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याकारणाने त्यांचे निलंबन करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले.
टको
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास प्राप्त झाले. त्यांचा कार्यभार अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे.
- ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)