विसापूर आश्रमशाळेत
२४ विद्यार्थिनी आजारी
कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : विसापूर (ता. कळवण) येथील आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर त्याच शाळेतील आणखी २४ विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. काश्मिरा संख्ये यांनी दिली.
कळवण आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या विसापूर आश्रमशाळेतील सृष्टी सूर्यवंशी या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच शाळेतील काही विद्यार्थिनींना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार केली. घटनेची माहिती तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली.
विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्रात न नेता थेट कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २४ विद्यार्थिनींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थिनींना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी वैद्यकीय तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत तक्रारी केल्या आहेत. सेंट्रल किचन बंद करण्याची मागणीही विद्यार्थिनींनी केली आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारी आणि त्यांच्या प्रकृती बिघडण्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.