पंचवटीतील धर्मशाळांच्या डागडुजी अन् पुनर्रचनेला वेग
यात्रेकरूंसाठी सुविधा वाढविण्याची गरज; निवासक्षमता वाढीवर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना पंचवटी परिसरातील जुन्या धर्मशाळांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची मोठी गरज निर्माण होणार असल्याने धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. पंचवटीतील काही धर्मशाळा नव्याने बांधण्यात येणार असून सिंहस्थासाठी विविध शासकीय व खासगी जागांसह धर्मशाळा आणि ट्रस्टच्या इमारतींच्या माध्यमातून निवासक्षमता उभारण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
पंचवटीत सिंघानिया धर्मशाळा, एमबीए ट्रस्ट, सीताभवन धर्मशाळा, अडवानी धर्मशाळा अशा अनेक धर्मशाळा आहेत. भाविकांच्या निवासाच्या दृष्टीने या धर्मशाळा महत्त्वाच्या ठरतात. रामतीर्थ, पंचवटी आणि गोदाघाटाच्या जवळ असलेल्या या वास्तूंचे वैशिष्ट्य़ म्हणजे धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ आणि माफक शुल्कामध्ये निवास मिळतो. मात्र सिंहस्थाच्या निमित्ताने या धर्मशाळांसमोर केवळ रंगरंगोटीचा नव्हे, तर पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षितता, अग्निसुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे नियोजन हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर रामतीर्थ परिसरातील सुमारे चार ते पाच दशकांपासून उभ्या असलेल्या काही धर्मशाळा नव्याने बांधण्यात येत आहेत. त्यावेळी येथे श्राद्ध व अन्य और्ध्वदेहिक विधींसाठी येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था पर्यायी जागेत करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या धर्मशाळांमध्ये छोट्या मोठ्या कामांना सध्या सुरुवात झाली आहे.
नाशिकमधील धार्मिक व सेवाभावी संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ८४ संस्थांनी नोंदणी केली असून त्यापैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. धार्मिक स्थळांना निधी मंजूर होतो मात्र धर्मशाळांसाठीही काही भरीव तरतूद करावी जेणेकरून भाविकांची व्यवस्था करता येईल, अशी मागणी येथील स्थानिक करीत आहेत. पंचवटीतील धर्मशाळांसाठी सिंहस्थ ही केवळ परीक्षा नसून जुन्या धार्मिक वास्तूंना आधुनिक सुविधा देत त्यांचे मूळ स्वरूप आणि सेवाभावी परंपरा टिकविण्याची संधी ठरू शकणार असल्याने या धर्मशाळांकडेही त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
---चौकट
ही आहेत आव्हाने
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सामावून घेण्याची क्षमता, पुरेशी स्वच्छतागृहे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, आपत्कालीन मार्ग आणि सीसीटीव्ही, जुन्या वास्तूंचे मूळ स्वरूप कायम ठेवणे आणि सिंहस्थानंतरही भाविकांसाठी या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवणे हे धर्मशाळेसमोरील प्रश्न आहेत, त्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे.