NSK26H28855
जळगाव : रामदास कॉलनी येथील उद्यान विकासकामांची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने, महापौर दीपमाला काळे आदी नगररसेवक व अधिकारी वर्ग.
---
रामदास कॉलनीतील उद्यान तीन महिन्यांत होणार खुले
साठ टक्के काम पूर्ण; वृक्षारोपण, ज्येष्ठांसाठी सुविधा अन् सौरदिव्यांवर भर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : रामदास कॉलनीतील निर्माणाधिन उद्यानाचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे आणि महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी दिले. उद्यानाच्या कामाची त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. सध्या उद्यानाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशस्त व आरामदायी बैठक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कामाची गती वाढवून उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना महापौर व आयुक्तांनी दिल्या.
पाहणीवेळी नगरसेवक नितीन बरडे, गायत्री राणे, ॲड. शुचिता हाडा, अनिल अडकमोल यांच्यासह शहर अभियंता योगेश बोरोले आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
सौरदिव्यांमुळे होणार वीजबचत
उद्यानातील विद्युत व्यवस्थेचा आढावा घेताना आयुक्त जिवने यांनी पारंपरिक पथदिव्यांऐवजी सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उद्यानातील वीजखर्च कमी होण्यासोबतच पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच उपस्थित नगरसेवकांनी उद्यान परिसरात विहीर खोदण्याची मागणी केली.