सीटीबी : डॉ. आदित्य एकबोटे
---
‘लाजेच्या पडद्याआडच्या वेदनांना उपचाराचा आधार’
गुदद्वाराच्या आजारांविषयी जनजागृतीचा ध्यास घेणारे डॉ. आदित्य एकबोटे
---
लीड
‘पाइल्स’, ‘फिशर’ किंवा ‘फिस्टुला’ हे शब्द उच्चारतानाही अनेकांना संकोच वाटतो. या आजारांबाबत घरातील जवळच्या व्यक्तीशी बोलण्यासही अनेकजण कचरतात. वेदना असह्य होत असतानाही डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते. परिणामी, सुरुवातीच्या टप्प्यात सहज नियंत्रणात येऊ शकणारी समस्या गंभीर स्वरूप धारण करते. आजारापेक्षा तो लपविणे अधिक धोकादायक ठरू शकते, ही जाणीव समाजापर्यंत पोचविण्याचे काम नाशिकचे प्रॉक्टोलॉजिस्ट आणि ॲनो-रेक्टल सर्जन डॉ. आदित्य एकबोटे सातत्याने करीत आहेत.
---
आठ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत डॉ. एकबोटे गोविंदनगर येथील ‘प्रॉक्टोकेअर हॉस्पिटल’च्या माध्यमातून पाइल्स, फिशर, फिस्टुला आणि गुदद्वाराशी संबंधित विविध आजारांवर उपचार करीत आहेत. मात्र, त्यांची भूमिका केवळ उपचारांपुरती मर्यादित नाही. या आजारांबाबतचा संकोच, भीती आणि गैरसमज दूर करून रुग्णांनी योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत आहेत. डेंगी, हृदयविकार किंवा इतर गंभीर आजारांबाबत लोक सहज चर्चा करतात; मात्र पाइल्स, फिशर किंवा फिस्टुलाचा विषय आला, की अनेकजण मौन बाळगतात. हा संकोच केवळ अशिक्षितांपुरता मर्यादित नाही, तर सुशिक्षितांमध्येही दिसून येतो. उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीही स्वतःचा अनुभव इतरांसमोर सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे जनजागृतीची साखळी तुटते आणि अनेक रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात. डॉ. एकबोटे यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील अनेक अनुभव या वास्तवाची साक्ष देतात. सुमारे ६५ वर्षांच्या एका महिलेला गंभीर संसर्गाचा त्रास होत असतानाही घरातील व्यक्तींना सांगण्याचा संकोच वाटत होता. अनेक दिवस वेदना सहन केल्यानंतर त्या उपचारासाठी आल्या. तोपर्यंत परिस्थिती गंभीर बनली होती. योग्य वेळी उपचार झाल्याने त्यांना दिलासा मिळाला; मात्र हा अनुभव डॉ. एकबोटे यांच्यासाठीही महत्त्वाचा संदेश देणारा ठरला. आजारी पडणे ही समस्या आहेच; पण आजार लपविणे त्याहून मोठी समस्या ठरू शकते.
---
माहितीच्या महासागरात वाढलेला गोंधळ
डिजिटल युगात रुग्णांची मानसिकता बदलली आहे. अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येण्यापूर्वीच इंटरनेटवर आजाराची माहिती शोधतात. काही जण यूट्यूबवर शस्त्रक्रियेचे व्हिडिओ पाहून येतात. कोणती पद्धत चांगली, लेझर करावे की दुसरी उपचारपद्धती निवडावी, कोणत्या गुंतागुंती संभवतात अशा अनेक प्रश्नांची माहिती ते आधीच घेऊन येतात. माहिती घेणे चुकीचे नाही; मात्र सर्वसाधारण माहितीच्या आधारे स्वतःबाबत निष्कर्ष काढणे धोकादायक ठरू शकते, असे डॉ. एकबोटे सांगतात. प्रत्येक रुग्णाची शारीरिक अवस्था, आजाराची तीव्रता आणि उपचाराची गरज वेगळी असते. इंटरनेट माहिती देऊ शकते; पण प्रत्यक्ष तपासणी करून योग्य उपचाराचा निर्णय डॉक्टरच घेऊ शकतात. गुदद्वाराच्या भागातील प्रत्येक त्रासाला सरसकट ‘पाइल्स’ म्हणण्याचीही प्रवृत्ती दिसून येते. प्रत्यक्षात पाइल्स, फिशर आणि फिस्टुला हे तीन वेगवेगळे विकार आहेत. त्यांची कारणे, स्वरूप आणि उपचारपद्धतीही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे स्वतःच निदान करण्याऐवजी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
---
बद्धकोष्ठतेपासून समस्यांची सुरुवात
आधुनिक जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढत असल्याचे डॉ. एकबोटे सांगतात. सतत बसून काम करणे, शारीरिक हालचालीचा अभाव, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अपुरी झोप, मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव यांचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. बद्धकोष्ठता एका दिवसात गंभीर आजार निर्माण करत नाही. मात्र, ती वारंवार होत राहिली आणि त्याकडे दुर्लक्ष झाले, तर पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य आहार, पुरेसे पाणी, तंतुमय पदार्थ, नियमित व्यायाम आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यास परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते.
---
डॉक्टरांकडे गेलो म्हणजे ऑपरेशनच होईल?
‘डॉक्टरांकडे गेलो म्हणजे लगेच ऑपरेशन सांगतील,’ ही भीती अनेकांच्या मनात असते. मात्र, प्रत्येक रुग्णासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असतेच असे नाही. आजाराचा टप्पा, वेदना, तक्रारींचे स्वरूप आणि प्रत्यक्ष तपासणी यावर उपचाराचा निर्णय अवलंबून असतो.
सुरुवातीच्या अवस्थेत काही रुग्णांना औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदलांचा फायदा होऊ शकतो. मात्र, आजार प्रगत अवस्थेत गेल्यास पुढील उपचारांची आवश्यकता निर्माण होऊ शकते. अशा वेळी भीतीपोटी उपचार टाळण्याऐवजी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
---
आरामदायी जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम
‘वर्क फ्रॉम होम’, जंक फूड आणि सतत स्क्रीनसमोर बसून काम करण्याच्या सवयींनी जीवन अधिक आरामदायी केले आहे. मात्र, त्याचबरोबर शारीरिक हालचाल कमी झाली आहे. काही मिनिटांत अन्न ऑर्डर करण्याची सुविधा, सहज उपलब्ध होणारे जंक फूड आणि अनियमित दिनचर्या यामुळे आरोग्यासमोर नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. बसून काम करणाऱ्यांनी नोकरी बदलण्याची गरज नाही; मात्र, दिनक्रमात हालचालीसाठी वेळ राखणे आवश्यक आहे. मधूनमधून उठणे, थोडे चालणे आणि नियमित व्यायाम करणे या छोट्या सवयी दीर्घकाळासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. आहाराच्या बाबतीतही प्रत्येकासाठी एकच नियम लागू होत नाही. ‘हाय फायबर’ म्हणजे सर्वांनी एकच पदार्थ खावा, असे नाही. प्रत्येकाची पचनक्षमता आणि शरीराची गरज वेगळी असते. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि शरीराला अनुकूल असलेल्या सवयी महत्त्वाच्या आहेत.
---
जागरूकतेला प्राधान्य
डॉ. आदित्य एकबोटे यांच्या वैद्यकीय वाटचालीचा केंद्रबिंदू केवळ शस्त्रक्रिया किंवा उपचार नाही. ‘आजार लपवू नका, योग्य वेळी उपचार घ्या’ हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाइल्स, फिशर किंवा फिस्टुला हे लाजण्याचे विषय नाहीत. शरीरातील इतर आजारांप्रमाणेच यादेखील वैद्यकीय समस्या आहेत. वेदना सहन करणे, घरगुती उपायांवर वेळ घालविणे किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वतःच उपचार ठरविणे यापेक्षा योग्य वेळी तज्ज्ञांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या उपचारासोबत त्याच्या मनातील भीती दूर करणे आणि समाजातील गैरसमज कमी करणे, हीदेखील वैद्यकीय सेवेची महत्त्वाची बाजू आहे आणि नेमका हाच विचार आपल्या कार्यातून जपण्याचा प्रयत्न डॉ. आदित्य एकबोटे करीत आहेत.
लाजेपोटी आजार लपविण्यापेक्षा वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचणे, हाच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी निर्णय आहे.
---
चौकट
पाइल्स, फिशर आणि फिस्टुला वेगवेगळे कसे?
पाइल्स : गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांमध्ये सूज किंवा फुगवटा निर्माण होणे.
फिशर : गुदद्वाराच्या भागात चीर पडणे किंवा जखम होणे.
फिस्टुला : संसर्ग किंवा पू झाल्यानंतर तयार होणारा असामान्य मार्ग.
या तिन्ही विकारांची कारणे, स्वरूप आणि उपचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणत्याही त्रासाला सरसकट ‘पाइल्स’ न म्हणता योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक आहे.
---
बद्धकोष्ठतेला आमंत्रण देणाऱ्या सवयी
सतत बसून काम करणे, शारीरिक हालचालीचा अभाव, जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, अपुरी झोप, मानसिक ताण, पुरेसे पाणी न पिणे, नियमित व्यायामाचा अभाव, योग्य आहार, पुरेसे पाणी, तंतुमय पदार्थ आणि नियमित हालचाल या सवयी आरोग्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.
---
उपचारानंतरही या सवयी महत्त्वाच्या
संतुलित आणि योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी, बद्धकोष्ठता टाळणे, शारीरिक हालचाल वाढविणे, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन. उपचार हा आरोग्याचा एक टप्पा आहे. योग्य जीवनशैली ही दीर्घकालीन आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
---
कोट
पाइल्स, फिशर, फिस्टुला किंवा गुदद्वाराशी संबंधित कोणताही आजार हा लाजण्याचा विषय नाही. वेदना किंवा त्रास होत असेल, तर तो लपवू नका. इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर स्वतःच उपचार ठरविण्यापेक्षा योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीच्या टप्प्यात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अनेक समस्या नियंत्रणात आणता येतात. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी शारीरिक हालचाल आणि बद्धकोष्ठता टाळणे या गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लाजेपोटी आजार लपवू नका; वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचा. कारण, योग्य वेळी घेतलेला उपचाराचा निर्णय वेदना आणि गंभीर गुंतागुंत टाळू शकतो.
- डॉ. आदित्य एकबोटे