रानभाजी महोत्सवातून महिला सक्षमीकरण
---
पालकमंत्री महाजन : पंचायत समितीमधील महोत्सवास भेट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन, स्थानिक शेतमालाला बाजारपेठ आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. महिला बचतगटांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत उद्योग-व्यवसाय उभारावे. स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि लखपती दीदी बनावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत नाशिक पंचायत समितीच्या आवारात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री महाजन यांनी शनिवारी (ता. ५) या महोत्सवाला भेट दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील, नगरसेवक सुधाकर बडगुजर व आदिती पांडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले, की रानभाजी महोत्सवासारख्या प्रदर्शनांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील रानभाज्या, बाजरी, नागली, ज्वारीसारख्या पारंपरिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश कमी होत चालला. रानभाज्यांसारखे पारंपरिक पदार्थ आता दुर्मीळ होत असून, त्यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ओमकार पवार यांनी रानभाजी महोत्सवातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत असल्याची भावना व्यक्त केली. या वेळी काही महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.
कुंभमेळा ही संधी : महाजन
स्थानिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रदर्शनांमधून नागरिकांना पारंपरिक पदार्थांची ओळख करून देणे आवश्यक आहे. स्थानिक, ताज्या आणि पारंपरिक अन्नपदार्थांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. उमेद अभियानातून बचतगटांची निर्मिती, महिलांना प्रशिक्षण, भांडवल व बँक कर्जाची सुविधा, उद्योग उभारणी, ब्रँडिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते, अशी माहिती महाजन यांनी दिली. कुंभमेळ्याच्या संधीचा लाभ महिला बचतगट, उद्योजक व स्थानिक उत्पादकांनी घ्यावा, असे त्यांनी केले.
फोटो क्रमांक : एच-28877