28881
सम्राट बनसाोडे
28880
शाोएब शेख गुलाम
भुसावळ अन् नशिराबादमधील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध
सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.५ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसदलाने गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. समाजात दहशत निर्माण करणाऱ्या भुसावळ तालुका व नशिराबाद हद्दीतील प्रत्येकी एक अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची (एपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हेगारी कृत्यात सहभागी आणि सतत सक्रिय असलेले, तसेच समाजासाठी घातक अशा गुंड गुन्हेगारांची पळताळणी केल्यानंतर प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाल्यावर त्यावर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब होतो.
नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (वय-३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद)याच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात दुखापत, गंभीर दुखापत, चोरी आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन यासह तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी प्रस्ताव तयार केला होता. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानंतर त्याला मध्यवर्ती कारागृह, येरवडा (पुणे) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई भुसावळ उपविभागात झाली आहे. येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सम्राटकुमार सुरेश बनसोडे (वय-३०, रा. आग्रावाली चाळ, भुसावळ)याच्याविरुद्ध भुसावळ शहर व तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी आणि मारामारी असे एकूण ५ गंभीर गुन्हे नोंद आहेत. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले. त्यानुसार त्याला मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
---------
अनेकांवर होणार कारवाई
जिल्ह्यात स्थानबद्धता कायद्यांतर्गत पेालिस दलाने कारवाईचा धडका सुरु केला असून, कायदा हातात घेणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या इतरही सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. अनेक सराईत गुन्हेगाराच्या दाखल गुन्ह्यांची तपासणी सुरु असून कारवाईची यादी प्रशासनाने तयार केली आहे.