धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 28883
साक्री : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत बोलताना पोलिस निरीक्षक दीपक वळवी. शेजारी पोलिस अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, आदी.
--
गणेशोत्सवात डीजेला फाटा; साक्रीत नियमांचे बंधन
--
पोलिसांची कठोर भूमिका; गणेश मंडळांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ५ : शहर आणि ग्रामीण भागात आगामी गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहात पार पाडावा यासाठी साक्री पोलिस ठाण्यात गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डीजे मालकांची समन्वय बैठक पार पडली. पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत प्रशासनाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक नियम व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.
-
या बैठकीत आरोग्याला होणारा अपाय आणि जीवितास होणारा धोका टाळण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही डीजे वाजविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक वळवी यांनी स्पष्ट केले. डीजे लावून मिरवणूक काढल्यास तो तात्काळ जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम प्रशासनाकडून देण्यात आला. मात्र नियम पाळून ठरवलेल्या ध्वनीमर्यादेत बँड, ढोल-ताशे आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यास परवानगी असेल. विसर्जन मिरवणुकीसाठी केवळ नोंदणीकृत मंडळांनाच परवानगी दिली जाणार असून रात्री १२ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी एक स्वतंत्र पोलिस अंमलदार नियुक्त करून पोलिस प्रशासन आणि मंडळांमध्ये उत्तम समन्वय साधला जाईल. गणपती आगमनाच्या मिरवणुकीस औपचारिक परवानगी नसली तरी गणपती बाप्पा वाजत-गाजत घेऊन जाण्यास पूर्ण मुभा असेल, असेही नमूद करण्यात आले.
-
विनाखंडित वीजपुरवठा करा
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या. यात मिरवणूक मार्गावरील खड्डे त्वरित बुजविणे, धोकादायक लोंबकळणाऱ्या वीजतारा व झाडांच्या फांद्या बाजूला करणे, उत्सवाच्या दहाही दिवसांत विनाखंडित वीजपुरवठा ठेवणे आणि विसर्जन मार्गावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. तसेच उत्सव काळात चिकन- मटण आणि दारूविक्री बंद ठेवावी आणि गणपती स्थापनेच्या ठिकाणापासून ५० मीटर परिसरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी आग्रही मागणीही मंडळांनी केली. खराब रस्ते व वीजपुरवठ्याबाबत संबंधित विभागांना पोलिस ठाण्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले.
-
मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा
प्रशासनाकडून मंडळांना मार्गदर्शन करताना प्रत्येक मंडळाने दहा दिवसांसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, मंडपांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. तसेच गणपतीच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांच्या वेळा निश्चित करून चोवीस तास सदस्य उपस्थित राहावेत. आक्षेपार्ह मजकूर, प्रक्षोभक देखावे किंवा धार्मिक भावना दुखावणारे बॅनर्स लावू नयेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांनी केले. गर्दीच्या वेळी चोऱ्या व अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळाच्या स्वयंसेवकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे सांगण्यात आले. साक्री शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांचे २०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.