धुळे ः टुडे १ साठी, मेन...........मेनच्या खाली संक्षीप्त पट्टा घ्यावा
--
फोटो क्रमांक ः 28889
न्याहळोद : पांझरा नदीचे पात्र.
--
तस्करांचा धुमाकूळ अन् रोज ११० डंपर उपसा!
-
धुळे जिल्ह्यातून वाळूची खुलेआम तस्करी; महसूल यंत्रणा सुस्त; कारवाई शून्य
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : पावसाळ्यामुळे शासनाकडून नियमानुसार वाळू उत्खननास बंदी असतानाही धुळे जिल्ह्यातील पांझरा, बुराई आणि तापी नदीपात्रातून खुलेआम तस्करी सुरू आहे. दिवसाही आणि विशेषतः रात्री- अपरात्री मोठ्या संख्येने ट्रक्टरव्दारे वाळूचा बेकायदेशीरपणे उपसा करायचा, नंतर ते ट्रक्टर नियोजीत गाव शिवारात न्यायचे आणि तेथे डंपर भरायचे, असा तस्करांचा सर्रास उद्योग जिल्ह्यात सुरू आहे. तीन ते चार महिन्यांपासून तस्करांनी धुमाकूळ घातलेला असतानाही महसूल यंत्रणेने मात्र झोपेचे सोंग घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तीन ते चार महिन्यात कुठलीही ठोस मोठी कारवाई नसल्याने तस्करांचीही हिंमत वाढली असून, यंत्रणेशी संगनमताने ते रग्गड कमाई करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पर्यावरणासंबंधी सर्व नियम धाब्यावर बसवून नदीपात्रांना क्षती पोहोचवली जात असल्याची गंभीर स्थितीही निर्माण झाली आहे.
-
धुमादोनशे ट्रक्टर गुंतलेले
वाळूचा बेकायदेशीर उपसा करण्यासाठी पांझरा नदीपात्र क्षेत्रातील न्याहळोद, नेर, कुसुंबा, आनंदखेडे (ता. धुळे), बुराई नदीपात्र क्षेत्रातील चिमठाणे, तापी नदीपात्र क्षेत्रातील अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा (ता. शिंदखेडा), उपरपिंड (ता. शिरपूर) आदी ठिकाणी मिळून एकूण दीडशे ते दोनशेहून अधिक ट्रक्टर गुंतले आहेत. अशा ट्रक्टरव्दारे वाळूचा उपसा झाल्यानंतर ते तस्करांनी सांगितलेल्या नियोजीत गाव शिवारात नेले जातात आणि त्या ठिकाणी डंपर भरले जातात. न्याहळोद, नेर, कुसुंबा, आनंदखेडे आणि चिमठाणे क्षेत्रात मिळून रोज ५० ते ६० आणि अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा, उपरपिंड क्षेत्रातून रोज सरासरी ५०, असे सर्व मिळून एकूण रोज १०० ते ११० डंपर वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात आहे. यात शिंदखेडा हद्दीतील तापी नदीपात्रालगत अमळनेर (जि. जळगाव) क्षेत्रातूनही बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचा प्रकार दुर्लक्षीत करता येण्यासारखा नाही. अशी गंभीर स्थिती असताना महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष कसे काय होऊ शकते, असा या क्षेत्रातील ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे. (क्रमशः)
-
१४-१
...बुलेटस्...
१४-१
* बेकायदेशीर वाळू उत्खननाचे प्रमुख ठिकाण
* पांझरा नदीपात्र- न्याहळोद, कुसुंबा, नेर, आनंदखेडे
* बुराई नदीपात्र- चिमठाणे
* तापी नदीपात्र- अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा, उपरपिंड
-
१४-१
...चौकट...
१४-१
‘आमच्याकडून लोडिंग, जबाबदारी तुमची...’
पांझरा, बुराई, तापी नदीपात्रातून ट्रक्टरव्दारे बेकायदेशीपणे होणाऱ्या वाळू उपश्यातून त्या- त्या ठिकाणाहून रोज सरासरी १०० ते ११० डंपर भरले जात आहेत. एका डंपरमध्ये पाच ते सहा ट्रक्टरव्दारे उपसा केलेली वाळू भरली जाते. एक डंपर सरासरी ३५ ते ४० टन वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. विशेष म्हणजे वाळू तस्करांनी त्यासाठी एक अजब फंडा वापरात आणला आहे. ‘आमच्याकडून डंपर लोडिंग, नंतर जबाबदारी तुमची (खरेदीदार तस्कराची)...’, असा तो फंडा आहे. ही अशी स्थिती अनेक ग्रामस्थांना ठाऊक असते, पण जिल्हा महसूल यंत्रणेचे अधिकारी- कर्मचारी आणि भरारी पथकांना माहित नसते, यावर कुणी कसा विश्वास ठेवावा?, असाही अनेक ग्रामस्थांना पडलेला एक प्रश्न आहे.
---