धुळे ः टुडे १ संक्षीप्त
--
नगाव शिवारात सात
लाखांची तार चोरीला
धुळे : नगाव (ता. धुळे) शिवारातील धोंडी फाटा परिसरात मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या श्री दत्ता जिनिंग फॅक्टरीच्या जागेतील ट्रान्सफार्मरमधील सात लाख रुपये किमतीची सातशे किलो कॉपर वाइंडिंग (तांब्याची तार) तसेच पंधरा हजार किमतीच्या कॉपरच्या आर्थिंग पट्ट्या चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा ते तीन सप्टेंबरला सकाळी नऊदरम्यान घडली. याप्रकरणी सातरणे येथील जयेश किशोर पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चोरट्यांनी ट्रान्सफार्मरमधील सुमारे सातशे किलो वजनाची कॉपर वाइंडिंग, तसेच ट्रान्सफार्मर पॅनेलला जोडलेल्या पंधरा किलो वजनाच्या कॉपरच्या आर्थिंग पट्ट्या लंपास केल्या. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
कान नदीत बुडून
वृद्ध महिलेचा मृत्यू
धुळे : पाय घसरून पडल्याने साक्री तालुक्यातील कान नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या ७१ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दोन सप्टेंबरला घोडदे शिवारात घडली. वत्सलाबाई भगवान महाजन (वय ७१, रा. घोडदे, ता. साक्री) असे त्या वृध्देचे नाव आहे. त्या दोन सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास शेतातून घरी परतत होत्या. केवडी पुनर्वसन बंधाऱ्याजवळून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने त्या नदीत पडल्या आणि वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. तीन सप्टेंबरला सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-