एजंट साळुंकेच्या घराची झडती

एजंट साळुंकेच्या घराची झडती
Published on
एजंट तुषार साळुंकेच्या घराची झडती --- शालार्थ आयडी घोटाळा : जप्त केलेला लॅपटॉप फॉरेन्सिकच्या ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिरपूरमधून अटक करण्यात आलेला एजंट तुषारकुमार साळुंके याची घरझडती घेण्यात आली असता, पोलिसांच्या हाती लॅपटॉप लागला. जप्त लॅपटॉपमधील माहिती मिळविण्यासाठी तो फॉरेन्सिकच्या ताब्यात विश्लेषणासाठी देण्यात आला आहे. संशयित तुषारकुमार साळुंके हा साक्रीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीला आहे. त्याच शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचाही या गुन्ह्यात सहभाग उघड झाला असून, त्यांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. साळुंके याने एजंट प्रशांत वाडिले याच्याशी संगनमत करून शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी व अधिकाऱ्यांना मोठ्या आर्थिक रकमा देत बेकायदेशीरपणे सुमारे २३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक शालार्थ आयडी मान्यता आदेश मिळवून देत शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ​तांत्रिक शिक्षण घेतलेल्या साळुंकेने आपल्या ज्ञानाचा गैरवापर करीत बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात मुख्य भूमिका बजावली होती. त्याने तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे व वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाच दिल्याचे व धुळे जिल्हा परिषदेच्या जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड करून त्याने बनावट आदेश दाखल केल्याचे तपासातून समोर आले आहे. नाशिक पोलिसांच्या पथकाने साळुंके याच्या उपस्थितीत त्याच्या साक्रीतील घराची झडती घेतली असता लॅपटॉप हाती लागला आहे. या लॅपटॉपमधून पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता असून, त्यासाठी तो फॉरेन्सिकच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी (ता. ७) त्यास पुन्हा नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले जाईल. आतापर्यंत आठ अटक सदरील गुन्ह्याचा सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, प्रशांत वाडिले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजय गरुड आणि दीपक गरुड या सात जणांना अटक करण्यात आली असून, तुषारकुमार साळुंके हा या प्रकरणातील आठवा संशयित आहे. तर, किरण पाटील, राहुल पवार हे जामिनावर सुटले असले, तरी उर्वरित संशयित अद्यापही कारागृहात आहेत. उपासनी यांच्या जामीन अर्जावरही सोमवारीच सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com