विसापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : विसापूर (ता. कळवण) शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण प्रशासन दडपण्याचा प्रयत्न करत असून, मंत्री झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. ५) केला. या वेळी आदिवासी विकासमंत्री, सचिव आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
आदिवासी वसतीगृहातील असुविधांबाबत आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ईदगाह मैदान येथे सुरू असलेल्या या आंदोलनाप्रसंगी विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणावरून संबंधित विद्यार्थ्यांनी सरकार व प्रशासनावर तोंडसुख घेतले. प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेमुळे पालक त्यांच्या पाल्यांना घरी घेऊन जात आहेत. परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची व्यथा त्यांनी मांडली. त्यामुळे शासनाने याप्रश्नी तातडीने लक्ष घालावे. मंत्र्यांनी जागेवर जाऊन पाहाणी करावी. तसेच सेंट्रल किचन पद्धती बंद करावी आदी मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या. मंत्री, सचिव व आयुक्त हटविण्याचा नाराही या विद्यार्थ्यांनी दिला.
विसापूर घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही पालकांकडून होत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे व भूषण पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदान गाठण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.