शहरात बरसल्या श्रावणी सरी, सखल भागात पाणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : शहर व परिसरात शनिवारी दिवसभर (ता. ५) श्रावणी सरी बरसल्या. त्यामुळे शहरातील सखल भाग तसेच रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. हवामान विभागाने पुढील पाच दिवस जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
नाशिककरांची शनिवारची पहाट (ता.५) पावसाच्या आगमनाने झाली. त्यानंतर दिवसभर अधूनमधून हजेरी लावणाऱ्या सरींमुळे छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे चांगले हाल झाले. तर आगामी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या पावसाने गाठले. त्यामुळे अनेकांनी खरेदी अर्ध्यावरच सोडून घराचा रस्ता पकडला. दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर तसेच खड्ड्यांमध्ये पाणी साचले. यावेळी काही रस्त्यांवर पावसामुळे चिखल झाला. त्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले. शहरात सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत ५.८ मिमी पर्जन्याची नोंद झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. विशेषतः पश्चिम पट्यातील पेठ, सुुरगाणा, दिंडोरीसह इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, गंगापूर- दारणासह जिल्ह्यातील दहा धरणांमधील विसर्ग कायम आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६१२ मिमी पर्जन्याची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६६ टक्के पाऊस पडला आहे.