गंगापूर रोडच्या आठ घरफोड्यांची उकल
---
तीन सराईतांना बेड्या; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालून नागरिकांच्या नाकात दम करणाऱ्या सराईत घरफोड्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सापळा रचून तीन सराईतांना अटक केली असून, त्यांच्याकडून गंगापूर ठाण्यातील तब्बल आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. घरफोड्यांकडून ४५ ग्रॅम सोन्यासह कॅमेरा, पुरातन नाणी आणि रोख रक्कम असा एकूण सहा लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लकी विल्सन भंडारे (वय २०), उमेश कैलास ठोके (२३) आणि अजय गोपीचंद बच्छिरे (२०, तिघे रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते.
दरम्यान, हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित लकी भंडारे व त्याचे साथीदार चोरीचा माल विक्री करण्यासाठी डोंगरे वसतिगृह मैदानावर येणार असल्याची खबर मिळाली होती. या आधारे पथकाने तत्काळ त्या परिसरात सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक डॉ. मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, किरण शिरसाठ, हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझिमखान पठाण, राम बर्डे, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, समाधान पवार आदींच्या पथकाने ही धडक कामगिरी केली.
...
सोन्याची लगड तयार करण्याचे साहित्य जप्त
संशयितांनी चौकशीत घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून ४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच लगडी, ५८ हजार रुपयांची रोख रक्कम, एक कॅमेरा, दोन पुरातन नाणी, तसेच सोन्याची लगड तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे गंगापूर पोलिस ठाण्यातील आठ गंभीर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.